बोगस मतदारांचा भरणा, माजी आमदार घोडमारे यांचा आरोप 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

 हिंगणा (जि.नागपूर) : हिंगणा विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीपेक्षा जवळपास 24 हजारांच्या घरात नवीन मतदारांची भर पडली. नागपूर शहरातील मतदारांनी हिंगणा मतदारसंघात मतदान केले. यामुळे भाजप-सेना महायुतीचे उमेदवार आमदार समीर मेघे यांच्या मतांची आघाडी वाढली असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीचे पराभूत उमेदवार माजी आमदार विजय घोडमारे यांनी पत्रकार परिषदेत केला. 

रायपूर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार घोडमारे पुढे म्हणाले, हिंगणा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत 3 लाख 76 हजार 924 मतदारसंख्या झाली. मतदारांची आकडेवारी मोठ्या प्रमाणात फुगली. नागपूर शहरातील अनेक मतदारांची नावे हिंगणा मतदारसंघात मतदार म्हणून टाकण्यात आली. अशा सर्व मतदारांनी यावर्षीच्या निवडणुकीत मतदान केले. त्यामुळेच महायुतीच्या उमेदवाराला 1 लाख 21 हजार 305 मते मिळाली. 46,167 मतांची आघाडी मिळाली. महायुतीच्या उमेदवाराच्या आघाडीची टक्‍केवारी मागील निवडणुकीपेक्षा दुपटीने वाढली. बोगस मतदारांमुळे टक्‍केवारी वाढली आहे. याबाबतची तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. निवडणूक विभागाने याची चौकशी करून जनतेसमोर सत्यता आणावी, अशी मागणी घोडमारे यांनी केली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग, रायपुरातील नेते विठ्ठल कोहाड उपस्थित होते. 
हिंगणा विधानसभा मतदारसंघात नवीन मतदारांची संख्या वाढली. माजी आमदार विजय घोडमारे यांच्या कुटुंबाची नावे नागपूर शहर व टाकळघाट येथील मतदार यादीत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. सर्वसामान्य जनतेने विकासकामाला प्राधान्य दिले. यामुळेच मागील निवडणुकीपेक्षा मतांची आघाडी दुपटीने वाढली. राष्ट्रवादी कॉंग्रेसने जनतेने दिलेला कौल मान्य करावा. लोकशाहीत मतदान करणाऱ्या मतदारांचा त्यांनी अपमान करू नये. पराभव पचविण्याची क्षमता ठेवावी. 
समीर मेघे 
आमदार, हिंगणा 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bogus voters pay, ex-MLA horseman charged