...अन्‌ बोलेरोने अडविला पाच कोटीच्या सिगारेट भरलेला कंटेनर  

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

मिळालेल्या माहितीनुसार, पाच कोटी तीस लाख रुपयांच्या सिगारेट घेऊन सीजी 04, एमटी 5231 क्रमांकाचाकंटेनर मध्यप्रदेशातील भोपाळवरून छत्तीसगडमधील रायपूरला जाण्यास निघाला.

खापरखेडा (जि. नागपूर) : भोपाळवरून नागपूर मार्गे रायपूरला सिगारेट घेऊन जाणारा कंटेनर खापरखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या नांदा (कोराडी) फाट्याजवळ रस्त्यावर बेवारस स्थितीत आढळून आला. मात्र, यावेळी त्यातील सव्वापाच कोटी रुपयांच्या सिगारेट गायब झाल्या होत्या. 

कंटेनरचा भोपाळवरून प्रवास सुरू 

मिळालेल्या माहितीनुसार, पाच कोटी तीस लाख रुपयांच्या सिगारेट घेऊन सीजी 04, एमटी 5231 क्रमांकाचाकंटेनर मध्यप्रदेशातील भोपाळवरून छत्तीसगडमधील रायपूरला जाण्यास निघाला. मंगळवारी (ता.17) हा कंटेनर दुपारी 2.15 वाजताच्या सुमारास नागपूर जिल्ह्यातील पाटणसावंगी येथील टोलनाक्‍याला पार करून पुढील प्रवासाला निघाला. 

Image may contain: car

बोलेरोने अडविला कंटेनर 

कंटेनर दहेगाव रंगारी येथील पुलाजवळ आला असता, त्याच वेळी अचानक मागाहून आलेली एक बोलेरो गाडी कंटेनरच्या पुढे आडवी झाली. बोलेरोमधील अज्ञात व्यक्तींनी कंटेनरचा चालक आणि क्‍लिनरला खाली उतरून तुम्ही कोथुर्णा परिसरात अपघात केल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी कंटेनर चालक सईद खान अब्दुल खान हमीद (वय 62, रा. भोपाळ) आणि क्‍लिनर रामसिंग यांच्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधून त्यांना बोलेरो गाडीत बसविले. त्यानंतर रात्री आठ वाजताच्या सुमारास त्यांना कोथुर्णा परिसरात आणून एका झाडाला बांधून ठेवले. त्यानंतर ते अज्ञात व्यक्ती बोलेरो घेऊन पसार झाले. 

Image may contain: outdoor

नांदा कोराडी फाट्याजवळ रिकामा कंटेनर आढळला 

अज्ञात व्यक्तींनी दहेगाव रंगारी पुलाजवळ अडविलेला कंटेनर त्यानंतर गेला कुठे, हे कळलेच नाही. मध्यंतरी संबंधित कंटेनर नांदा कोराडी फाट्याजवळ बेवारस स्थितीत उभा असलेला आढळला. त्यावेळी पूर्णपणे रिकामा होता. त्यातील पाच कोटी 30 लाख रुपयांच्या सिगारेट गायब झाल्या होत्या. इकडे झाडाला बांधून ठेवलेल्या कंटेनरच्या चालक आणि क्‍लिनरने स्वतःची कसीबसी सुटका केली. त्यानंतर त्यांनी थेट खापरखेडा पोलिस ठाणे गाठून पोलिसांना आपबिती सांगितली. 

कंटेनर मालकाचा चालकाशी संपर्काचा प्रयत्न

या दरम्यान कंटेनरचे मालक गोपीनाथ यांना आपला कंटेनर नांदा-कोराडी फाट्याजवळ बेवारस उभा असल्याचे कंटेनरला लावण्यात आलेल्या जीपीआरएसच्या माध्यमातून दिसले. गाडीला काय झाले म्हणून त्यांनी कंटेनरचा चालक व क्‍लिनरला भ्रमणध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. त्यांना शंका आल्याने त्यांनी सुपरवायझर शकील खान व विमा कंपनीच्या प्रतिनिधीला कंटेनर असलेल्या ठिकाणाकडे रवाना केले. 

अवश्‍य वाचा- बस अपघातात एक ठार; 41 जखमी 

पोलिसांनी केली कंटेनरची पाहणी 

संबंधित कंटेनर नांदा शिवारातील मार्गावर बेवारस उभा असल्याने त्याचा इतर वाहतुकीला अडथळा होत होता. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांना फोन करून कंटेनरबाबत माहिती दिली. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी जाऊन कंटेनरची पाहणी केली. त्यांना कंटेनरचे कुलूप तुटल्याचे दिसून आले. या घटनेबाबत कंटेनर मालकाने सुद्धा पोलिसांना माहिती दिली. हे प्रकरण संशयास्पद वाटत असल्याने खापरखेडा पोलिसांनी वृत्त लिहिस्तोवर गुन्ह्याची नोंद केलेली नव्हती. 

कंटेनर चालक, क्‍लिनरची आपबिती

कंटेनर दहेगाव रंगारी शिवारात मुख्य मार्गावरून जात असताना अज्ञात व्यक्तींनी बोलेरो कंटेनरपुढे आडवी केली. तुमच्या गाडीने अपघात झाल्याचे सांगून डोळ्यांवर पट्टी बांधून गाडीत बसविले आणि कोथुर्णा परिसरात नेवून झाडाला बांधले. कसीबसी सुटका करून खाप्यात रात्र काढली व सकाळच्या सुमारास खापरखेडा पोलिसात जाऊन आपबिती सांगितली. 

सिगारेट खाली कुठे केले असावे? 

हे प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात असून सिगारेट भरलेला ट्रक मध्यप्रदेशात खाली केला असावा का? किंवा गाडी खालीच तर आली नसेल ना? संबंधित कंटेनर कोराडी नांदा फाट्यावर कसा पोचला याबाबत पोलीस घटनास्थळापासून मुख्य मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. सव्वापाच कोटी रुपयांच्या सिगारेट गेल्या कुठे यांचे बिंग पोलीस तपासात लवकर उघड होऊन दोषींवर कारवाई होणार असल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Bolero stopped container filled with cigarettes