निर्दयीपणाचा कळस, वरवंट्याने ठेचून जन्मदात्याचा खून, भीतीने मातेने काढला पळ

The boy killed his father by crushing him with a stone
The boy killed his father by crushing him with a stone

धामणगावरेल्वे (जि. अमरावती) :  एका 34 वर्षीय मुलाने जन्मदात्या वडिलांचा पाटा-वरवंट्याने ठेचून खून केला. ही घटना धामणगाव तालुक्‍यातील परसोडी येथे मंगळवारी (ता.22) सकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. तालुक्‍यातील परसोडी येथील रामकृष्ण लक्ष्मण काळे (वय 70) हे त्यांची पत्नी विमल काळे व मुलगा धम्मदीप काळे (वय 34) यांच्यासोबत राहत होते. धम्मदीप काळे हा मनोरुग्ण असल्यामुळे नेहमीच आई-वडिलांसोबत वाद घालून त्यांना मारहाण करीत होता. 

यासंदर्भात दत्तापूर पोलिस ठाण्यात चार दिवसांआधी फिर्याद नोंदविण्यात आली होती. धम्मदीप मारहाण करीत असल्यामुळे त्याला सोमवारी (ता.21) रात्री पलंगाला बांधून ठेवण्यात आले होते. मंगळवारी (ता. 22) सकाळी सहा वाजताच्या सुमारास रामकृष्ण काळे धम्मदीपला उपचारासाठी दवाखान्यात नेण्याबाबत फोनवर बोलत होते. आई आंघोळीसाठी गेली होती. दरम्यान, धम्मदीप काळे याने घरातील पाटा-वरवंटा घेऊन आपल्या जन्मदात्या वडिलांवर सपासप वार केले व त्यांचे डोके चेंदामेंदा केले. यात वडील रामकृष्ण काळे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. 

विमल जिवाच्या भीतीने पळत सुटल्या व आरडाओरड करून त्यांनी गावातील लोकांना बोलविले. मात्र त्यावेळेस धम्मदीपच्या भीतीपोटी कोणीही समोर जाण्याचे धाडस केले नाही. या घटनेची माहिती परसोडी येथील पोलिस पाटील नीलेश गावंडे यांनी दत्तापूर पोलिस ठाण्याला दिली. पोलिस उपनिरीक्षक राजेश पुरी, पोलिस कर्मचारी मंगेश लकडे, सुधीर बावणे, श्री. गायधने, आकाश बेलसरे, संदीप वासनिक, धनंजय झटाले, श्री. मिश्रा यांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा केला व प्रेत उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. 

विमल यांच्या फिर्यादीवरून दत्तापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास ठाणेदार ब्रह्मदेव शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक द्वारका अंभोरे व पोलिस करीत आहेत. दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे यांनी घटनास्थळाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली.
 

कोरोनाकाळात मिळाला नाही उपचार 

जन्मदात्या वडिलांचा खून करणारा धम्मदीप काळे 12 वी उत्तीर्ण असून अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाला प्रवेश घेतल्यानंतर मनोरुग्ण झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने मनोरुग्णसंदर्भातील रुग्णालय बंद असल्याने जुजबी उपचार मिळत नसल्याने आई-वडिलांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे दत्तापूर पोलिस ठाण्यात चार दिवसांपूर्वी धम्मदीप विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

संपादन : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com