पाच व्यक्तींना जीवदान देऊन वेदांतने घेतला जगाचा निरोप

प्रकाश गुळसुंदरे 
सोमवार, 2 डिसेंबर 2019

हरम येथील सामाजिक कार्यकर्ता राम पंडित बद्रटिये यांचा नातू वेदांत हरम येथील जनता विद्यालयात 10 व्या इयत्तेत शिकत होता. गेल्या 27 नोव्हेंबर रोजी त्याचा अपघात झाला. त्यात वेदांतचा मेंदू मृत झाला होता. त्याला नागपूर येथील होकार्ड हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते.

परतवाडा (जि. अमरावती) : "मरावे परि कीर्तिरुपे उरावे' असे म्हटले जाते. मात्र, "मरावे परि अवयवरुपे उरावे' अशाप्रकारचा संदेश देत एक तरुण आपल्यातून निघून गेला. त्याने जाण्यापूर्वी पाच जणांना जीवदान दिले. अचलपूर तालुक्‍यातील हरम येथील बद्रटिये कुटुंबाने मानवतावादी निर्णय घेतल्याने समाजासमोद आदर्श निर्माण केला आहे. 

प्रकृतीत सुधारणा न झाल्याने घ्यावा लागला निर्णय 
हरम येथील सामाजिक कार्यकर्ता राम पंडित बद्रटिये यांचा नातू वेदांत हरम येथील जनता विद्यालयात 10 व्या इयत्तेत शिकत होता. गेल्या 27 नोव्हेंबर रोजी त्याचा अपघात झाला. त्यात वेदांतचा मेंदू मृत झाला होता. त्याला नागपूर येथील होकार्ड हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृतीत काहीही सुधारणा न झाल्याने बद्रटिये कुटुंबाने वेदांतला अखेर परतवाडा येथील भंसाली हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. डॉ. आशीष भंसाली यांनी वेदांतचा मेंदू मृत (ब्रेनडेड) झाल्याचे सोमवारी (ता. दोन) घोषित केले. 

Image may contain: 6 people
परतवाडा : अवयव दान करताना कुटुंबातील सदस्य.

धाडसी निर्णय 
वेदांतच्या अचानक जाण्यानंतर त्याचे आजोबा राम पंडित बद्रटिये, वडील दुष्यंत बद्रटिये, जावई राजीव खोजरे, जयंत चिठोरे, आई अंजली, बहीण मुक्ता यांनी विचारविनीमय करून वेदांतच्या अवयवदानाचा धाडसी निर्णय घेतला व तो डॉ. भंसाली यांच्या जवळ बोलून दाखविला. विस्तृत चर्चेनंतर डॉ. भंसाली यांनी मार्गदर्शनाकरिता सर्व त्या तांत्रिक व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या. 

नागपूरस्थित वेगवेगळ्या तीन रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्‍टरांचे एक पथक सर्व वैद्यकीय यंत्रणेसह सोमवारी (ता. दोन) सकाळी भंसाली हॉस्पिटल येथे दाखल झाले. त्यांनी वेदांतच्या दोन जिवंत किडन्या व लिव्हर काढले. तर अमरावती येथील हरिना नेत्रदान समितीच्या वैद्यकीय चमूकडून वेदांतचे दोन्ही डोळे काढले गेले. या वेळी मृत वेदांतचे नातेवाईक, डॉ. हर्षराज डफळे, डॉ. राजेश उभाड, डॉ. विजय वर्मा, श्री. पिंजरकर, श्री. अग्रवालसह पुनर्जीवन फाउंडेशन व संकल्प सेवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

हेही वाचा - video : अंत्यसंस्काराला जाताना शोधावी लागते वाट

ग्रीन कॉरिडॉरची शहरातील दुसरी घटना 
नर्सरी येथील श्रीमती इंगळे या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर 17 ऑगस्ट 2018 ला भंसाली हॉस्पिटल येथूनच यकृत दान करण्यात येऊन ग्रीन कॉरिडॉरची निर्मिती करण्यात आली होती. आता वेदांतच्या अवयवदान निमित्ताने ग्रीन कॉरिडॉरची भंसाली हॉस्पिटल येथील दुसरी घटना घडली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: brain dead vedant gave life to five people