मेंदूज्वराने एकाचा मृत्यू झाल्याचे उघड 

file Photo
file Photo

नागपूर : बिहारमध्ये जपानी मेंदूज्वराने कहर केला आहे. शेकडो चिमुकले या आजाराच्या विळख्यात आहेत. त्याच मेंदूज्वराचे रुग्ण नागपूर विभागात आढळल्याची धक्‍कादायक बाब पुढे आली. विशेष म्हणजे, जपानी मेंदूज्वराने एका चिमुकल्याचा मृत्यू झाला असून, विभागात सात रुग्णांची नोंद झालेली आहे. आरोग्य विभागाने बिहारमधील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर पूर्व विदर्भात सर्वच जिल्ह्यांत उपाययोजना केल्याची माहिती दिली. 
बिहारमधील मेंदूज्वराचा संसर्ग पूर्व विदर्भात पोहोचू शकतो. नागपूर विभागात मेंदूज्वराबाबत दक्ष राहण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. मागील पाच महिन्यांत नागपूर विभागात जपानी मेंदूज्वराच्या सात रुग्णांपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जपानी मेंदूज्वराचा संसर्ग डासांमार्फत होतो. सर्वसाधारणपणे डुकरांमध्ये जपानी मेंदूज्वराचे विषाणू जास्त आढळतात. त्यांना चावा घेतलेल्या "क्‍युलेक्‍स डासाच्या मादीकडून मानवाला दंश झाल्यानंतर या विषाणूंचा प्रसार होतो. पावसाळ्यात या डासांची उत्पत्ती वाढते. यामुळे रुग्णसंख्येतही वाढ होते. पूर्व विदर्भात भात शेती मोठ्या प्रमाणात होत असल्याने या पट्ट्यात डासांची उत्पत्ती होते. दरम्यान, 1 जानेवारी ते 31 मे 2019 या काळात नागपूर विभागातील वर्धा 2, गोंदिया 1, चंद्रपूर 1, गडचिरोली 3 असे सात रुग्ण आढळले. तर गोंदियात उपचारादरम्यान एक बालक दगावला. 
चंडीपुरावर नियंत्रण 
सात वर्षांपूर्वी जपानी मेंदूज्वरापेक्षा चंडीपुरा मेंदूज्वराचा दरवर्षी पूर्व विदर्भात प्रकोप होत असे. सॅण्डफ्लायमुळे चंडीपुरा मेंदूज्वर होत असून, हा आजार मुलांनाच होत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. मात्र आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. मिलिंद गणवीर यांनी विशेष उपाययोजना करून चंडीपुरा मेंदूज्वरावर मागील तीन वर्षांपासून नियंत्रण मिळवले आहे. मात्र, नागपूर विभागात यंदा जपानी मेंदूज्वराने पुन्हा डोके वर काढले आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com