धाडसी मायलेकींना उपचारासाठी विकावे लागले दागिने

Rupali Meshram
Rupali Meshram

भंडारा : शिकारीच्या शोधात गावात आलेल्या वाघाशी धाडसाने झुंज केल्याची घटना साकोली तालुक्‍यातील उसगाव येथे नुकतीच उघडकीस आली. या घटनेची वनविभागाने दखल तर घेणे सोडाच त्यांच्या उपचाराची देखील सोय केली नाही. त्यामुळे नागपुरात उपचार घेण्यासाठी या मायलेकींना अंगावरील दागिनेही विकावे लागले. या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये चांगलाच संताप आहे.
साकोली-तुमसर मार्गावरील दाट जंगलात असलेल्या उसगाव येथे गावालगतच्या वस्तीत रूपाली राजकुमार मेश्राम (वय 21) आई जिजाबाईसोबत राहते. गाव जंगलाला लागून असल्याने शिवारात वन्यप्राण्यांचा नेहमी वावर असतो. त्यामुळे सायंकाळनंतर गावकरी सहसा गावाबाहेर जात नाहीत. 24 मार्चला रूपाली आईसह घरात झोपली होती. मध्यरात्री त्यांना अंगणात बांधलेल्या शेळीच्या ओरडण्यामुळे जाग आली. काय झाले हे पाहण्यासाठी रूपाली दार उघडून बाहेर आली. तिथे शेळी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्याचवेळी अंगणात दडून बसलेल्या वाघाने रूपालीवर हल्ला केला. प्रसंगावधान राखून अंगातील पूर्ण शक्ती एकवटून तिने वाघाचा प्रतिकार केला. हा आवाज ऐकून जिजाबाईसुद्धा बाहेर आल्या. दोघींनी मिळून काठीने वाघाला चांगलेच बदडले. यात दोघीही जखमी झाल्या. दोघींच्या आक्रमणाला घाबरून शेवटी वाघ जंगलाकडे पळून गेला.
यानंतर जखमी मायलेकी घरात आल्या. शेजारची घरे दूर असल्याने त्यांनी भ्रमणध्वनीवरून त्यांना माहिती दिली. गावकऱ्यांनी ही माहिती वनकर्मचाऱ्यांना दिली. गावकऱ्यांनी जखमी रूपाली व तिच्या आईला साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. जिजाबाई किरकोळ जखमी असल्याने त्यांना प्रथमोपचारानंतर सुटी देण्यात आली. परंतु, रूपाली गंभीर जखमी झाल्याने तिला भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, नंतर नागपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये तिला दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान जवळचे सर्व पैसे संपल्याने अंगावरील दागिने विकण्याची वेळ या मायलेकींवर आली. मात्र वनविभागाने कोणत्याही प्रकारची मदत देण्याचे साधे सौजन्यही दाखवले नाही. उपचारानंतर दोघींचीही मंगळवारी (ता. 3) रुग्णालयातून सुटी झाली.
वाघाला हरविल्याचा आनंद
परिसरात वाघाचा वावर असतानाही वनविभगाने त्याचा बंदोबस्त केला नाही. वाघाशी झुंज करताना मी जीवाची पर्वा केली नाही. त्याला पळवून लावण्यासाठी संपूर्ण शक्‍ती एकवटून आईसोबत त्याच्याशी झुंज दिली. वाघाला हरविल्याच खूप आनंद आहे.
- रुपाली मेश्राम
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com