चार ईव्हीएममध्ये बिघाड; 20 व्हीव्हीपॅट बदलविले 

 हिंगणा ः धनगरपुरा जिल्हा परिषद शाळेत मतदानासाठी रांगा लावलेले मतदार.
हिंगणा ः धनगरपुरा जिल्हा परिषद शाळेत मतदानासाठी रांगा लावलेले मतदार.

हिंगणा (जि.नागपूर) : हिंगणा विधानसभा मतदारसंघात चार ईव्हीएममध्ये ऐनवेळी बिघाड निर्माण झाला. 20 व्हीव्हीपॅट तांत्रिक कारणास्तव बंद पडले. त्यामुळे या केंद्रावर तातडीने ईव्हीएम व व्हीव्हीपॅट बदलून मतदानाची प्रक्रिया सुरळीत करण्यात आली. मतदारसंघात 60 टक्‍के मतदान झाले आहे. 
सकाळी साडेसात वाजेपासून मतदानाची प्रक्रिया 434 मतदान केंद्रांवर सुरू झाली. सकाळी आठ वाजेपर्यंत मतदारांची फारशी गर्दी दिसून आली नाही. सकाळी दहा वाजेनंतर मतदारांच्या रांगा हिंगणा, रायपूर, बुटीबोरी, वाडी, वानाडोंगरी, नीलडोह, डिगडोह, वडधामना, कवडस, गुमगाव, फेटरी, बोखारा, गोधनी या सर्वच मतदान केंद्रांवर दिसून आल्या. मतदारसंघातील बूथ क्र.10, 101, 342, 345 मधील ईव्हीएम बंद पडल्या होत्या. प्रशासनाने टकले या ठिकाणी नवीन मशीन लावल्या. तसेच 20 व्हीव्हीपॅट तांत्रिक कारणामुळे नादुरुस्त झाल्या. या ठिकाणचे व्हीव्हीपॅट मशीन बदलण्यात आल्या. ग्रामीणमध्ये दोन तर शहरी भागात दोन भरारी पथक नेमण्यात आले होते. जीपीएस सिस्टिम लावलेल्या शासकीय वाहनात राखीव ईव्हीएम ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे ईव्हीएम बिघाड झालेल्या ठिकाणी तातडीने मशीन पोहोचविता आल्या. 
तालुक्‍यात दोन ठिकाणी बोगस मतदान झाल्याने त्या ठिकाणी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात आले. एसआरपीएफ येथील उच्च प्राथमिक शाळेत बूथ क्र.202 वर वाहतूक पोलिस विभागातील पीएसआय मतदान केंद्रावर गेले. त्यापूर्वी त्यांच्या नावावर कुणीतरी मतदान केले होते. याची तक्रार त्यांनी मतदान केंद्राध्यक्षांकडे केली. त्यानंतर त्यांना बॅलेटद्वारे मतदान करू देण्यात आले. असाच प्रकार कान्होलीबारा येथील 356 या मतदान केंद्रावर घडला. येथे वासुदेव बुंदे या मतदाराच्या नावावर कुणीतरी आधीच मतदान केले होते. इथेही त्यांना बॅलेट पेपरवर मतदान करू देण्यात आले. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी इंदिरा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार मोहन टिकले व संतोष खांडरे यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी उत्तम कामगिरी बजावली. रात्री उशिरापर्यंत मतदान केंद्रावरून ईव्हीएम मशीन आणण्याचे काम सुरू होते. ईव्हीएम मशीनमध्ये भाजप-सेना युतीचे उमेदवार समीर मेघे व राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार विजय घोडमारे यांचे भाग्य बंद झाले आहे. मतदानाची टक्‍केवारी पाहता मतदारांनी कुणाच्या बाजूने कौल दिला, हे आता 24 तारखेला मतमोजणीदरम्यानच स्पष्ट होणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com