लाच घेणारे पोलिस तत्काळ बडतर्फ

अनिल कांबळे
बुधवार, 17 जुलै 2019

नागपूर : लाच घेताना एसीबीच्या "ट्रॅप'मध्ये अडकल्यास संबंधित पोलिस कर्मचाऱ्यास तत्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे. पोलिस महासंचालकांनी तसा आदेश काढल्याने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. हाच नियम इतर सरकारी कर्मचाऱ्यांनी का नाही? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

शिस्तीचे अधिकारी म्हणून पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांची ख्याती आहे. पोलिस विभागातील भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शी कारभार निर्माण करण्यासाठी डीजी प्रयत्नरत आहेत. "लाच घेताना एसीबीने कारवाई केल्यास त्या कर्मचाऱ्यांना पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात येईल' असा आदेश त्यांनी काढला. त्या आदेशाची राज्यात अंमलबजावणी सुरू असून सुमारे शंभरावर अधिक कर्मचारी घरी बसले आहेत. लाचेवर आळा घालण्यासाठी उपरोक्त निर्णय धाडसी मानला जात आहे. मात्र अनेकदा या आदेशाचा अडकवण्यासाठी दुरुपयोगसुद्धा केला जातो. न मागता केवळ पैसे हातात जबरदस्तीने कोंबल्यानेही अनेकजण सापळ्यात अडकले आहेत.
एकमेकांची जिरविण्याची प्रथा
अनेकदा पोलिस ठाण्यातील कामांमुळे पोलिस कर्मचारी एकमेकांचा द्वेष करतात. त्या द्वेषापोटी तक्रारदारांना सहकारी कर्मचाऱ्यांविषयी चुकीची माहिती देणे, तसेच एसीबीमध्ये तक्रार करण्याचा फुकटचा सल्ला देणे, यासारखे प्रकार घडतात. अशा प्रकारांमुळे एकमेकांचे कायमचे नुकसान आणि सामाजिक बदनामीचा सामना करावा लागतो.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bribe takers police now immediately suspended