तंत्रज्ञानाच्या मदतीने संतांचे विचार युवापिढीसमोर आणा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

नागपूर : संत साहित्याचे विचार अमूल्य ठेवा आहे. त्या विचारातून मूल्याधिष्ठित आणि संस्कारित युवा पिढी घडविता येणे शक्‍य आहे. त्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानाचा आधार घेत हे विचार नव्या पिढीसमोर मांडा, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

नागपूर : संत साहित्याचे विचार अमूल्य ठेवा आहे. त्या विचारातून मूल्याधिष्ठित आणि संस्कारित युवा पिढी घडविता येणे शक्‍य आहे. त्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानाचा आधार घेत हे विचार नव्या पिढीसमोर मांडा, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात आयोजित "ज्ञानोबा-तुकाराम' पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा मोठा आहे. अनेक संत या भूमीत झालेत. त्यांचे ग्रंथ आणि काव्य हे समाजासाठी प्रेरणास्रोत आहे. तेच साहित्य विद्यापीठांमधून संशोधक आणि प्राध्यापकांनी अभ्यास करून युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. संत वाङ्‌मयाचा साहित्यापुरता अभ्यास मर्यादित नाही. इतिहास आणि संस्कृती हीच आपली खरी ताकद आहे. तेव्हा या साहित्याला युवा पिढीसमोर आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. सर्व भाषेतून जगासमोर आणावे लागेल असेही नितीन गडकरी म्हणाले.
डॉ. म. रा. जोशी यांनी त्याचा अभ्यास करून वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांनी केलेले कार्य तंत्रज्ञानातून पुढे यावे. यासाठी सांस्कृतिक संचालनालय आणि सरकारनेही पुढाकार घेण्याचे आवाहन गडकरी यांनी केले. नितीन गडकरी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानचिन्ह देत डॉ. म. रा. जोशी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पंढरपूरचे बडवे यांनीही त्यांचा सत्कार केला.
महाराष्ट्राचे वैचारिक, सांस्कृतिक धन हे पोथ्यांमध्ये आहे. "देवाशी भक्त बोलतो, देव भक्तांशी बोलतो' हे श्रद्धेचे भावविश्‍व निर्माण करण्याचे कार्य संतांनी केल्याचे सत्काराला उत्तर देताना डॉ. म. रा. जोशी म्हणाले. हे कार्य अखंड सुरू राहणारे असून, ती एक यात्रा असल्याचेही ते म्हणाले. सन्मानित केल्याबद्दल त्यांनी संचालनालयाचे आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bring the ideas of the Saints to the young generation with the help of technology