एसीबीच्या हिटलिस्टवर आता ‘दलाल’

भगवान वानखेडे 
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

दलालांच्या आडून लाच घेणारे शासकीय अधिकाऱ्यांची होणार चौकशी नागरिकांनी तक्रारी करण्याचे आवाहन

अकोला ः सरकारी नोकरांच्या वतीने सर्वसामान्यांना काम करुन देतो म्हणत लाच घेणारे दलाल (एजंट) आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर आहेत. तर या दलालांच्या मुसक्या आवळून लाचखोरीला पायबंद बसविण्याचा चंग अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बांधला असून, या दलालांच्या माध्यमातून लाचखोर शासकीय अधिकाऱ्यांची चौकशी होणार असल्याची माहिती विश्‍वसनिय सूत्रांनी दिली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 2019 या वर्षातील डिसेंबरमध्ये जिल्हाभर जनजागृतीपर मोहीम राबविली होती. या मोहीमेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना कोणीही लाच मागत असेल तर सरळ तक्रार दाखल करा असे आवाहन करण्यात आले होते. या जनजागृतीचा सकारात्मक परिणाम झाला असून, नवीन वर्षातील दीडच महिन्यांत पाच ट्रॅपमध्ये पाच जणांना अटक केली आहे. यामध्ये दोन ट्रॅप दलालांवर आहेत. तर मिळालेल्या विश्‍वसनिय माहितीनुसार, आता यापुढे विविध शासकीय कार्यालयासोबतच सर्वोपचार रुग्णालयामध्ये सर्वसामान्यांची लुबाडणूक करणाऱ्या दलालांवर एसीबीचा ‘वॉच’ असून, पुढील काही दिवसांत या दलालांच्या मुसक्या आवळल्या जाणार आहेत. तेव्हा आता सर्वसामान्यांना लुबाडणारे दलांची खैर नसल्याचे दिसून येत आहे.

No photo description available.

पडद्यामागील सरकारी नोकरांची होणार चौकशी
दलालांच्या माध्यमातून लाच स्वीकारणारे सरकारी कर्मचारीही एसीबीच्या हिटलिस्टवर असणार आहेत. अश्‍या सगळ्यांची ‘कुंडली’ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जमा केली असून, एजंटाला सापळ्यात अडविल्यानंतर तो कोणासाठी काम करीत होता याची सखोल चौकशी करून त्या सरकारी नोकरांच्या नांग्या ठेसल्या जाणार असल्याची विश्‍वसनिय माहिती समोर येत आहे.

No photo description available.

जो करेल तो भोगेलच
खासगी व्यक्तीच्या माध्यमातून असो की, मग स्वतः कोणाची लुबाडणूक करीत असो त्या सरकारी नोकराची कुठल्याच प्रकारची गय केली जाणार नाही. तेव्हा नागरिकांनी न भीता एसीबीकडे तक्रार करावी, जो पैशासाठी त्रास देत असेल अश्‍या नोकरांवर लक्ष असून, जो गुन्हा करेल तो भोगेलच अशीही माहिती विश्‍वसनिय सूत्रांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Brokers' now on ACB's hitlist