मृताच्या भावानेच शोधले अपघाती वाहन

मृताच्या भावानेच शोधले अपघाती वाहन

महिनाभरानंतर आरोपी गवसला - ट्रकच्या धडकेत झाला होता आकाशचा मृत्यू

आरमोरी - अनेकदा पोलिस विभाग जे काम करू शकत नाही ते काम जबर इच्छाशक्‍तीच्या बळावर एखादी सर्वसामान्य व्यक्‍ती करते. एखाद्या चित्रपटात किंवा सीआयडीसारख्या मालिकेत घडावा, असाच प्रसंग येथे घडला. ट्रक अपघातात मृत झालेल्या भावाच्या खुन्याला शोधण्यासाठी जंगजंग पछाडणाऱ्या योगेश वनमाळीला अखेर त्या ट्रकचा शोध लागला.

गोगाव येथील बसथांब्यावर २९ डिसेंबर २०१६ मध्ये अज्ञात ट्रकने दिलेल्या धडकेत आरमोरी येथील आकाश वनमाळी या काळीपिवळी चालकाचा मृत्यू झाला. या घटनेबाबत गडचिरोली पोलिसांनी केवळ गुन्हा दाखल केला.

तपास मात्र शून्य होता. ही बाब आकाशचा भाऊ योगेशला खटकली. त्याने या अपघाताचा छडा लावण्याचा निर्धार केला. योगेशने सर्वत्र कसून शोध घेत तब्बल महिनाभरानंतर आकाशला धडक देणारा ट्रक व त्याच्या चालकाचा शोध घेतला. आरमोरी पोलिसांनी रविवारी (ता. २९) ट्रकचालकासह ट्रक ताब्यात घेतला. अक्षय रवींद्र गेडाम (वय २३, रा. मूल, जि. चंद्रपूर) असे आरोपी ट्रकचालकाचे नाव आहे. 

२९ डिसेंबरला गोगाव येथील बसथांब्यावर काळीपिवळी वाहनाजवळ उभ्या असलेल्या आरमोरी येथील चालक आकाश वसंतराव वनमाळी (वय २५) याला गडचिरोलीवरून आरमोरीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिली होती. या अपघातात आकाशचा जागीच मृत्यू झाला. याबाबत गडचिरोली पोलिस ठाण्यामध्ये अनोळखी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता.

परंतु, पोलिसांना आरोपी सापडला नव्हता. मृताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याच्या मारेकऱ्यांचा शोध लावण्याचा निश्‍चय आकाशचा भाऊ योगेशने केला. त्याने घटनेनंतर दोन-तीन दिवसांनी गडचिरोली-आरमोरी मार्गावरील एका व्यक्तीकडून डिसेंबरच्या निघालेल्या ट्रकचे फुटेज मिळविले. अपघात ९.५० वाजता झाला होता. गडचिरोली-गोगाव अंतर लक्षात घेऊन ९.३० ते ९.४५ या कालावधीत जाणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद ट्रक बघितले. यामध्ये निर्भय ट्रान्सपोर्ट बल्लारशहा असा लिहिलेला एक ट्रक आढळून आला. परंतु, त्याचा क्रमांक दिसत नव्हता. ट्रकचे छायाचित्र योगेशने ताब्यात घेऊन कोरची गाठले. येथील एका पानठेलाचालकास याबाबत विचारणा केली. पानठेलाचालकाने हा ट्रक कोरची येथे आला होता. चालक घाबरलेल्या अवस्थेत होता, अशी माहिती दिली. 

योगेशने कोरची समोरील टोलनाक्‍यावर जाऊन विचारणा केली असता, नाक्‍यावरील एका व्यक्तीने एमएच-३४ एम-२३८६ ऐवजी २९८६ असा नंबर दिला. योगेशने या ट्रकचा पत्ता लावण्यासाठी बल्लारशहा येथील विसापूर नाक्‍यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील २८ डिसेंबरचे फुटेज तपासले. तपासणीदरम्यान गडचिरोली व विसापूर येथील ट्रकचे फुटेज मिळते-जुळते आढळून आले. त्याने गडचिरोली पोलिस ठाण्यास कळविले. 

दरम्यान, २९ जानेवारीला हा ट्रक आरमोरी येथील किशोर वनमाळी यांच्या दुकानासमोर दिसून आला. योगेशला मिळालेल्या ट्रकचा क्रमांक एमएच-३४ एम-२९८६ असा होता. परंतु, ट्रकवरील क्रमांक २३८६ असल्याचे आढळून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com