अनुदानाच्या वाटणीवरून भावाला दगडाने ठेचले 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

शनिवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास गणेश मोठ्या भावाच्या शेतात गेला. त्यावेळी रमेश तुरी काढत होता. दोघांमध्ये अनुदान रकमेच्या वाटणीवरून वाद झाला.

नागपूर : कपाशीवरील लाल्या रोगाच्या नुकसान भरपाई अनुदानाच्या वाटणीवरून झालेल्या वादातून मोठ्या भावाला दगडाने ठेचून ठार केल्याची घटना शनिवारी कळमेश्‍वर तालुक्‍यातील तेलकामठी येथे घडली. रमेश संतोष वाढीकर असे मृताचे नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सावनेर पोलिस स्टेशन अंतर्गत येणारा तेलकामठी येथे मृत रमेश व गणेश वाढीकर यांची शेती आहे. गतवर्षी लाल्या रोग आल्याने त्याची नुकसान भरपाईचे अनुदान मोठा भाऊ रमेश यास मिळाल्याची माहिती गणेशला मिळाली. शनिवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास गणेश मोठ्या भावाच्या शेतात गेला. त्यावेळी रमेश तुरी काढत होता. दोघांमध्ये अनुदान रकमेच्या वाटणीवरून वाद झाला. रागाच्या भरात गणेशने मोठा भाऊ रमेशच्या डोक्‍यात दगड घातला. यात रमेशचा जागीच मृत्यू झाला. यानंतर घटनास्थळावरून गणेशने पळ काढला. सावनेर पोलिसांनी माहिती मिळताच त्यांनी पंचनामा करून मृतदेहास शवविच्छेदनासाठी पाठविले. सावनेर पोलिसांनी आरोपी गणेश संतोष वाढीकर यास अटक केली आहे.

Web Title: The brother was killed because of dispute on distribution of subsidy