बसपचे साखरे यांचा लेटरबॉम्ब

बसपचे साखरे यांचा लेटरबॉम्ब

नागपूर : विधानसभेची निवडणूक आटोपताच बसपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. कालच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणारे प्रदेशाध्यक्ष तसेच उत्तर नागपूरचे उमेदवार सुरेश साखरे यांनी प्रदेश प्रभारी अशोक सिद्धार्थ यांनी उमेदवारांकडून पैसे घेतल्याचा आरोप केला. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. 
सुरेश साखरे उत्तर नागपूरमध्ये बसपचे उमेदवार होते. त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. सायंकाळी निकाल जाहीर होताच त्यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली. पक्षविरोधी कारवाया केल्याचा तसेच पक्षाच्या विरोधात जाऊन स्वत:च उमेदवारी घेतल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला. मात्र सुरेश साखरे यांनी अशोक सिद्धार्थ यांचे आरोप खोडून काढले. ते खोटे बोलत असल्याचाही आरोप केला. साखरे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार सर्वांच्या मतानुसारच उमेदवार ठरवण्यात आला. पक्षप्रमुख मायावती प्रचाराला आल्या होत्या. अशोक सिद्धार्थ यांनीसुद्धा या प्रचार सभेत भाषण केले, असे म्हटले आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच यंदा तिकीट देण्यात आले. त्यासाठी कोणताही पैसा घेतला नाही. उमेदवारांकडून फॉर्मसाठी जो पैसा घेण्यात आला तो अशोक सिद्धार्थ आणि पक्षाचे कोषाध्यक्ष यांनी घेतल्याचा आरोपही त्यांनी लावला. आपल्यावर करण्यात आलेली कारवाई अन्यायकारक असल्याचेही साखरे यांनी म्हटले आहे. 
लोकसभा निवडणुकीत नागपूरचे लोकसभा उमेदवार मोहम्मद जमाल पराभूत होताच त्यांचीसुद्धा पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. मात्र "आर्थिक' हितातून ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा आजही कार्यकर्त्यांमध्ये आहे. उमेदवार पराभूत झाल्यानंतर त्याची पक्षातून हकालपट्टी करण्याची आणि एकमेकांवर आरोप करण्याची परंपराच बसपमध्ये निर्माण झाली असल्याचे या घटनेवरून दिसून येते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com