
बुलडाणा : समृद्धी द्रुतगती महामार्गात नियमबाह्य कामे
मेहकर : मुंबई नागपूर समृध्दी द्रुतगती महामार्गाच्या कामात अनेक नियमबाह्य बाबी करण्यात आल्या असून शासनाचे कोट्यवधींचे नुकसान होण्याबरोबरच अंडरपास जमिनीत घेतल्याने पाणी साचून शेतकर्यांना खूपच त्रासाचे झाले आहे. शेतरस्ते कबूल करूनही मागणीप्रमाणे करण्यात आले नाहीत.
मुंबई नागपूर बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाच्या डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट ( डी पी आर) नकाशाप्रमाणे कुठलीच कामे करण्यात आली नसून डी पी आर मध्ये समावेश नसतांना संपादित जमिनीतच गेल गॅस कंपनीची पाईप लाईन शासनाला मोबदला न मिळता टाकण्यात आली असून यात वरिष्ठ स्तरावर खूप मोठा भ्रष्ट्राचार झाला असल्याची शक्यता आहे. मुळात ४०० फूट जागा महामार्गासाठी शेतकर्यांकडून संपादित करण्यात आली असली तरी २०० फुटाचाच रस्ता बनविण्या आला आहे. डी पी आर मध्ये गॅस पाईप लाईन चा समावेश नव्हता परंतु नंतर राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ स्तरीय अधिकार्याने मंत्र्यांच्या सहमतीने मुंबई ते नागपूर गेल गॅस कंपनी ची पाईप लाईन यात घुसडली .यात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता आहे. ९ फूट जागा गॅस कंपनीला फुकटात दिल्या गेली आहे. अन्यथा गॅस कंपनीला शासनाच्या मदतीने स्वतंत्ररित्या जमीन संपादन करावी लागली असती.
आमदार डॉ. रायमूलकर यांनी शेतरस्ते संघर्ष समिती च्या मागण्यांसाठी उपोषण केले. कबुल केल्याप्रमाणे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्यांनी काहीही केलेले नाही. शेतरस्ते केले नाही, समृध्दी च्या जड वाहनांमुळे खराब झालेल्या रस्त्यांची कामे केली नाहीत. त्यामुळे चिखल झाला आहे. अंडरपास रस्त्याच्या लेव्हलला करण्याचे कबूल केले पण ते जमिनीत दीड फूट खोल केल्याने पावसाचे पाणी साचून शेतीचे नुकसान होत आहे.
शेतकर्यांना रस्ता उरला नाही. अंडरपास खोल घेतल्याने त्रासदायक तर झालेच शिवाय भराव कमी भरावा लागल्याने कंत्राटदाराचा फायदा झाला आहे. समृध्दी मार्ग करायचा पण खालच्या शेतकर्यांना वार्यावर सोडायचे असा प्रकार झाला आहे. वाहतुकीसाठी अंजनी उमरा शिवारातील काच नदीवर पाईप टाकून कच्चा पूल केला होता ते पाईप आज कंत्रादाराने काढून घेतले. शेतकर्यांना वाहतुकीसाठी अडचण निर्माण झाली आहे. असे अनेक प्रकार सुरू आहेत. समृध्दी च्या वाहनांमुळे खराब रस्ते दुरुस्तीसाठी ३२ कोटींची कामे ऑपको कंपनीला दिलीत ,पण तीही अर्धवट स्थितीत आहेत.
नागरिक हैराण आहेत. ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे द्यावीत अशी काही राजकारण्यांची मागणी होती. म्हणजे ती कामे कार्यकर्त्यांना मिळून खिसे भरणे सोयीचे होईल ,असा त्यामागे उद्देश होता ,पण तसे झाले नाही. डोणगाव लोणी गवळी रस्त्याचे काम फक्त एक किलोमीटर झाले असून उर्वरित काम बाकी असून हा रस्ता खूपच खराब अवस्थेत आहे.
समृध्दी मध्ये अनेक चुकीच्या गोष्टी करण्यात आल्या त्याचे उदाहरण म्हणजे पर्यावरण खात्याची परवानगी घेतांना १० फूट जागेत रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली जातील अशी लेखी हमी देण्यात आली. प्रत्यक्षात ही जागा गॅस पाईप लाईन टाकण्यासाठी वापरण्यात आली. डी पी आर मध्ये गॅस पाईप लाईन टाकण्याच्या कामाचा डी पी आर नकाशात समावेशच नाही ! म्हणजे यात पर्यावरण खात्याची शुध्द फसवणूक करण्यात आली आहे . अशा एक अनेक नियमबाह्य गोष्टी अधिकार्यांनी समृद्धीत केल्या असून त्याची जंत्री खूप मोठी आहे. मूळ डी पी आर ची प्रत सकाळ च्या हाती लागली असून यात खूप मोठ्या नियमबाह्य बाबी अधिकार्यांनी मनमानीपणे केल्याचे उघड झाले आहे.महामंडळाचे कार्यकारी अभियंता श्री भरडे अडचणीचे ठरत होते म्हणून त्यांची बदली करून त्याजागी आता मुंबईहून श्री वाकोडे आले आहेत.
Web Title: Buldana Illegal Works On Mumbai Nagpur Samrudhi Expressway
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..