साहित्य संमेलन स्थळ निवडीत 'फिक्‍सिंग'चा संशय 

शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

बुलडाणा दौऱ्याची औपचारिकता : रात्रीतून येणार अहवाल 

संमेलनासाठी दिल्ली, बडोदा आणि हिवरा आश्रम हे तीन पर्याय आहेत. यापैकी दिल्ली आणि बडोदा या दोन्ही स्थळांची पाहणी केल्यानंतर हिवरा आश्रमचीसुद्धा पाहणी होणार आहे, असे कळले. ही भेट नऊ तारखेला होऊन दुसऱ्याच दिवशी स्थळाची घोषणा होणार असल्याचेही कळते. यात तिन्ही जागांच्या योग्यतेची तुलनात्मक तपासणी करण्यासाठी जो वेळ घ्यायला हवा तो दिला जात आहे का, असा प्रश्‍न उपस्थित होतो. 
- बाबाराव मुसळे, ज्येष्ठ कवी-कादंबरीकार 

नागपूर : साहित्य संमेलनस्थळाच्या घोषणेच्या एक दिवस आधी हिवरा आश्रमचा (बुलडाणा) दौरा केल्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची स्थळ निवड समिती एका रात्रीतून तिन्ही स्थळांचा तुलनात्मक अभ्यास करण्याची किमया साधणार आहे. दिल्ली आणि बडोद्यानंतर तब्बल वीस दिवसांच्या अंतराने बुलडाण्याचा दौरा होत असल्याने या निवडीत 'फिक्‍सिंग'चा संशय येत आहे. 

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या मागील बैठकीत संमेलनासाठी आलेल्या सहापैकी दिल्ली, बडोदा आणि बुलडाणा हे तीन प्रस्ताव विचारात घेण्यात आले. त्यानुसार 19 आणि 20 ऑगस्टला दिल्ली आणि बडोदा या दोन स्थळांना स्थळ निवड समितीने भेट दिली. लांबचे अंतर असल्याने चार दिवस या दोन शहरांना भेटी देण्यात गेले. त्याचवेळी चार-पाच दिवसांच्या अंतराने हिवरा आश्रमला भेट देणे सोयीचे ठरू शकत होते. मात्र, तसे न करता थेट नऊ सप्टेंबरला म्हणजेच स्थळ घोषणेच्या एक दिवस आधी बुलडाणा दौरा निश्‍चित करण्यात आला. शनिवारी हा दौरा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 सप्टेंबरला महामंडळाच्या बैठकीत अहवाल मांडण्यात येईल आणि सायंकाळी संमेलनस्थळाची घोषणा होईल. 

'घटनेप्रमाणे स्थळ निवड समिती तिन्ही स्थळांना भेट देऊन महामंडळाच्या बैठकीत अहवाल देईल', असे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. म्हणजे एका रात्रीत हा अहवाल सिद्ध होईल, हे स्पष्ट आहे. एखाद्या स्थळाला वैयक्तिक पसंती असणे स्वाभाविक असली तरीही महामंडळाच्या पातळीवर 'ये बात कुछ हजम नही हुई' अशी स्थिती आहे. 

महामंडळाच्या बैठकीला जोडून तसेच स्थळ निवड समितीच्या सदस्यांची सोय लक्षात घेता हिवरा आश्रमचा दौरा ठरला आहे. 
- डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, अध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य महामंडळ 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
सदाभाऊ यांचा अखेर 'सवतासुभा'
इनक्‍युबेटरचा सरसकट वापर अनावश्‍यक
ओडिशात आघाडी करणार नाही: अमित शहा
फिरोज, ताहीर यांना फाशीची शिक्षा
श्रुती बडोले यांनी शिष्यवृत्ती अर्ज घेतला मागे
उच्चशिक्षण क्षेत्रासमोरच्या आव्हानांवर चिंतन
बैलांच्या शर्यतींबाबतचा मसुदा अंतिम टप्प्यात
तरंगत्या सौर पॅनेलद्वारे 'उजनी'वर ऊर्जानिर्मिती शक्‍य
हिंसाचाराला "डेरा'चे आर्थिक पाठबळ
कोमलला मिळाले मदतीचे ‘हृदय’

Web Title: buldhana marathi news literary meet venue fixing