पोलिस व महसूल प्रशासनाने पकडले राशनचे धान्य

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

दोन महिन्यात जिल्ह्यातील तस्करी चव्हाट्यावर
गेल्या दोन महिन्यामध्ये धान्य तस्करी करण्याच्या 11 घटना समोर आल्या असून, यामध्ये आतापर्यंत 3 कोटींच्यावर किंमतीचे धान्य व मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. परंतु, अद्यापही जिल्हा पुरवठा विभाग सतर्क झाले नसून, तस्करांना एकप्रकारे भय देत असल्याचे समोर येत आहे. 

बुलडाणा : गेल्या दोन महिन्यापासून जिल्ह्यात सुरु असलेल्या स्वस्त धान्याची काळाबाजारी थांबता थांबत नसून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी केलेल्या कारवाई मेहकर ते चिखली दरम्यान लव्हाळा फाट्यानजीक गुरुवारी (ता. 14) सार्वजनिक वितरण प्रणालीचा 19 हजार 490 किलो गहू तसेच दोन वाहनासह 25 लाख 61 हजार 820 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राशनच्या धान्याची होणारी काळाबाजारी पाहता जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी यंत्रणा सतर्क केली असून, चोरीछुप्या मध्यरात्रीनंतर अवैधरित्या साठा करुन ठेवलेलया सार्वजनिक वितरण प्रणालीतील गहू काळ्या बाजारात विक्रीकरीता जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळाली. याबाबत महसूल विभागाला माहिती दिल्यानंतर चिखली ते मेहकर मार्गावर असलेल्या लव्हाळा फाट्यानजीक 4.30 वाजेदरम्यान ट्रक क्रमांक एमएच 37 जे 4663 मध्ये गहू आढळून आला. मालासंदर्भात चौकशी केली असता तो राशनचा असल्याचे समोर आले.

यानंतर महसूल विभागाने त्यांचे मुल्याकंन करत कारवाईसाठी साखरखेर्डा पोलिस स्टेशनला धान्याने भरलेला ट्रक नेण्यात आला. यमाध्ये 19 हजार 490 किलो गहू (किंमत तीन लाख 50 हजार 820 रुपये), ट्रक (एमएच 37 जे 4663, किंमत 14 लाख), एक स्वीप्ट डिझायर (एमएच 28 एएन 2117, किंमत सात लाख), तीन मोबाईल सेट ( किंमत 11 हजार रुपये) असा माल जप्त करण्यात आला. यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील काळाबाजारीचे नेटवर्क समोर आले असून, जिल्हा पुरवठा विभाग झोपेचे सोंग घेत असल्याचे समोर येत आहे. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: buldhana marathi news ration food