'माणसापरीस गुरं बरी, इमानदारी टिकविली त्यांनीच खरी'

विरेंद्रसिंह राजपूत
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

लोणवडी येथील एकनाथ मिठाराम जवंजाळ यांचेकडे तशी जेमतेम शेती.परंतु शेती म्हटली की आजच्या यांत्रिकीकरणाच्या युगातही गावापासून कोसोदूर असलेल्या शेतीला वाहायचे म्हणजे बळीराजाला बैलाची गरज ही भासतच असते,त्यातून शेतीमशागतीचे काम उरकल्या जात असल्याने व अर्थांजनाला हातभार लागत असल्यामुळे शेतकऱ्यासाठी बैल जोडी ही अत्यावश्यक बाब झाली आहे.

नांदुरा (बुलडाणा) : अलीकडे प्रत्येक सरकारी किंवा कुठल्याही क्षेत्रात कामचुकारपणा किंवा दिलेले काम न करण्याची वृत्ती सर्रास बघायला मिळते,पण इमाने इतबारे राबणारा बळीराजा घरच्या जनावरांना सुध्दा जीव लावून इमानदारी कशी शिकवतो याचे जिवंत उदाहरण नांदुरा तालुक्यातील लोणवडी या छोट्याशा गावात सद्या बघायला मिळत आहे.

लोणवडी येथील एकनाथ मिठाराम जवंजाळ यांचेकडे तशी जेमतेम शेती.परंतु शेती म्हटली की आजच्या यांत्रिकीकरणाच्या युगातही गावापासून कोसोदूर असलेल्या शेतीला वाहायचे म्हणजे बळीराजाला बैलाची गरज ही भासतच असते,त्यातून शेतीमशागतीचे काम उरकल्या जात असल्याने व अर्थांजनाला हातभार लागत असल्यामुळे शेतकऱ्यासाठी बैल जोडी ही अत्यावश्यक बाब झाली आहे. बैल तर सर्व शेतकऱ्यांजवळ असतातच, परंतु काही बैल शेतकऱ्यांच्या सवयीतून व आपल्या इमाने इतबारे कार्यातून एक वेगळी ओळख निर्माण करतात. त्यापैकीच ही जोडी असून दररोज ही बैलजोडी चालकविना गाड्यासह शेतात ये-जा करीत असते. गेल्या आठ वर्षांपासून या सर्जाराजाचे हे कार्य अविरत सुरू आहे. या शेतकऱ्याचे शेत हे नांदुरा-मोताळा या राज्यमार्गावर असल्याने या मार्गावर तशी वाहनांची वर्दळ ही नेहमीच असते. मात्र वाहनांना कोणतीही बाधा निर्माण होणार नाही याची काळजी हे सर्जाराजा घेताना दिसतात.

रस्त्याच्या बरोबर एक साईडला चालून जणू मानवालाही रस्त्याच्या नियमाची ते साक्ष देत असल्याने पाहणाऱ्या प्रवाशांनाही शरमेने मान खाली घालावी लागते. याच बैलगाड्याला त्या शेतकऱ्याची इतरही जनावरे बांधलेली असतानाही रस्त्याने कोणतीही बाधा आजपर्यंत निर्माण झाली नाही. हा शेतकरी बैलांना गाड्याला जुंपून दिल्यानंतर सवडीने शेतात जातो मात्र तोपर्यतही या बैलाकडून आजपर्यंत शेती पिकाचे कोणतेही नुकसान झाल्याचे या शेतकऱ्यांला आठवत नाही. याच रस्त्यावर गुरांचा गोठा असल्याने घरून निघालेली बैलजोडी तेथेही थोडावेळ थांबत असल्याचे या शेतकऱ्याचे म्हणणे आहे. मी कधीकधी सायकलने तर कधी इतरांच्या किंवा स्वतःच्या मोटरसायकलने शेतात लवकर पोहचवून इतर कामे आटोपून घेतो. तोपर्यंत हि बैलगाडी येत असते. त्यामुळे माझ्या वेळेची बचत होते.असे शेतकऱ्याचे मत आहे.माझी ही जोडी खरोखरच इमानदारी चे दर्शन घडविते.

शेतकऱ्याच्या घरचं कुत्रं असो की जनावरं त्याचा प्रामाणिकपणा नक्कीच वाखाणण्याजोगा असतो हेच या बैल जोडीवरून दिसून येत आहे.म्हणूनच..
'माणसापरिस गुरं बरी..
खोटी नाहीच गोठ हाय खरी....
गड्या माणसापरीस गुरं बरी.
असे म्हटल्यावाचून राहवत नाही

Web Title: Buldhana news bullcart from farmers