होल्ड ने थांबतेय शेतकर्‍यांचे जीवन

पंजाबराव ठाकरे
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

- तुरीच्या रक्कमेवर बँकेकडून कारवाई
- जगण्यापेक्षा मरणेच बरे असल्याच्या प्रतिक्रिया

- तुरीच्या रक्कमेवर बँकेकडून कारवाई
- जगण्यापेक्षा मरणेच बरे असल्याच्या प्रतिक्रिया

संग्रामपूर (बुलढाणा) : कर्जांचा डोंगर, रुसलेला हमीभाव अन् दारात आलेले नव्याने पीक विकण्याची चिंता अशी परिस्थिती सातपुड्यातील कोरडवाहू शेतकर्‍यांची झाली आहे. कर्जमाफीच्या आशेवर बसलेल्या शेतकर्‍यांवर आंदोलन करण्याची वेळ येऊन कर्जमाफीची आश्‍वासन अद्यापही पूर्ण होत नसल्याने पदरी निराशाच पडली असल्याची मानसिकता आहे. यामुळे घराचा संसारगाडा हाकलण्यासाठी तोकड्या भावात विकलेल्या शेतमालाचा मोबदलाही बँक आता कर्जखात्यात वळती करत त्याला होल्ड लावत असल्याचा कारभार संग्रामपूर तालुक्यातील शेतकर्‍यांसोबत असल्याचे समोर आले आहे.

संग्रामपूर तालुक्यातील निमखेड येथील रमेश परकाळे या शेतकर्‍याने नाफेडअंतर्गत संग्रामपूर केंद्रावर 14 क्विंटल तूर विकली. त्या 14 क्विंटल तुरीच्या रकमेपोटी सदर शेतकर्‍याला महाराष्ट्र बँकेच्या धनादेशाद्वारे मोबदला प्रदान करण्यात आला. धनादेश बँकेत जमा केल्यानंतर रमेश परकाळे हे आवश्यकतेनुसार बँकेत रक्कम काढण्यासाठी गेले असता त्यांना विड्रॉल देण्यात आला नाही. यावेळी त्यांनी पैसे मिळण्यासाठी काय अडचण आहे का? धनादेश वटविण्यामध्ये काही अडचण? असल्याचे विचारले असताना त्यांना प्रथम समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. परंतु, त्यानंतर त्यांनी कारण विचारले असताना विकलेल्या तुरीचे पैसे पीक कर्ज थकीत असल्यामुळे देता येत नाही, असे सांगून परत करण्यात आले. कर्जमाफीची प्रक्रिया शासनस्तरावर सुरू असून, शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती पाहता शेतकर्‍यांचे धनादेश बँकांनी कर्जखात्यात वर्ग करण्यात येऊ नये असे आदेश असतानाही बँक धनादेश वटवित खात्याला होल्ड करत आहे. याप्रकारे परिसरातील अनेक शेतकर्‍यांच्याही तक्रार समोर येण्याची शक्यता आहे. वारंवार चकरा मारुन हतबल झालेल्या शेतकर्‍यांनी स्वत:च्याच पैशासाठी पायपीट करावी लागत असल्याची खंत व्यक्त करत शासनावर रोष व्यक्त केला आहे. ऐन शेतीच्या कामात पैसे काढण्यासाठी तालुक्याला माराव्या लागणार्‍या चकरा आणि होणारी आर्थिक तसेच मानसिक हानी शेतकर्‍यांचे मनोधर्य खचत आहे.

महसूल दरबारीही हतबलता
बँकेने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर रमेश परकाळे यांनी थेट सोमवारी (ता. 13) तहसील कार्यालयाची पायरी चढत तहसीलदारांना तक्रार सादर करत पैसे मिळण्यास बँक खोडा निर्माण करत असल्याचे सांगितले असता येथील तहसीलदारांनी तुम्ही आणि बँक पहात बसा असा सल्ला देत शेतकर्‍याला माघारी परतण्याचे सांगितले. यामुळे महसूल दरबारीही शेतकर्‍यांची निराशा झाली.

बँकेतील 100 खात्यावर होल्ड
शासनाची कर्जमाफी जाहीर झाली असली तरी जो पर्यत कर्जाची रक्कम खात्यात जमा होणार नाही तो पर्यत असे होल्ड झालेले खात्यातून रक्कम निघणार नाही असे बँकेचे म्हणणे आहे. संग्रामपूर महाराष्ट्र बँकेचे जवळपास 100 खाते ना होल्ड असल्याची माहिती आहे. यामुळे शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेऊनही शेतकर्‍यांमध्ये शासनाबाबत तीव्र नाराजीचा सुर ऐकू येत आहे. अगोदरच यंदा सोयाबीन, कपाशी, उडीद, मूग पिकाच्या नापिकिने शेतकरी त्रस्त आहेत. त्यात प्रशासनाकडून अशी त्रास देण्याची भूमिका शेतकर्‍यांच्या मानसिकतेला धक्का देणारी ठरत आहे.

पुण्याहून लागतोय होल्ड
शासनाला विकलेल्या तुरीची रक्कम पीककर्ज खात्यात गोठवून ठेवल्याचा प्रकार शेतकर्‍याच्या मानसिकतेला धक्का देणारा ठरणारा आहे. यामध्ये स्थानिक बँकेचा कुठलीही भूमिका नसून 2012 चे आतील पीककर्जाला पुण्यावरून होल्ड लावले जातात असे महाराष्ट्र बँक संग्रामपूर कडून सांगण्यात आले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: buldhana news farmer money bank and government