बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानीचे 'धोंडी धोंडी कर्ज दे' आंदोलन

शाहीद कुरेशी
शुक्रवार, 23 जून 2017

शासन निर्देशानुसार थकबाकीदार शेतकऱ्यांना तातडीने दहा हजार रूपयांपर्यंत पीक कर्ज देण्यात यावे, या मागणीसाठी स्वाभिमानीने राणा चंदन यांच्या नेतृत्वाखाली आज (शुक्रवार) मोताळा स्टेट बॅंकेसमोर "धोंडी धोंडी कर्ज दे' अशा घोषणा देत अनोखे आंदोलन केले. यावेळी स्टेट बॅंकेच्या शाखाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

मोताळा (जि. बुलडाणा) - शासन निर्देशानुसार थकबाकीदार शेतकऱ्यांना तातडीने दहा हजार रूपयांपर्यंत पीक कर्ज देण्यात यावे, या मागणीसाठी स्वाभिमानीने राणा चंदन यांच्या नेतृत्वाखाली आज (शुक्रवार) मोताळा स्टेट बॅंकेसमोर "धोंडी धोंडी कर्ज दे' अशा घोषणा देत अनोखे आंदोलन केले. यावेळी स्टेट बॅंकेच्या शाखाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

पावसाने पाठ फिरवल्यास अनेक जण निसर्गाला "धोंडी धोंडी पाणी दे' अशी साद घालत असतात. मात्र पेरणीसाठी कर्ज मिळावे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शुक्रवारी येथील स्टेट बॅंकेसमोर "धोंडी धोंडी कर्ज दे' अशी हाक देत अनोखे आंदोलन केले. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, शाखाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया होईपर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना तातडीने दहा हजार रुपयांपर्यंत पीक कर्ज देण्याचे निर्देश राज्य सरकारने संबंधित यंत्रणेला दिले आहेत. मात्र बॅंकांकडून शेतकऱ्यांना अद्याप एक रुपयाही मिळाला नाही. सध्या पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहे. तर, अनेक शेतकऱ्यांची पेरणीची सोय नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत. त्यामुळे शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटांच्या चक्रव्यूहात अडकला आहे. शासन निर्देशानुसार शेतकऱ्यांना पेरणीसाठी तत्काळ दहा हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.

या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्‍चिम विदर्भ अध्यक्ष राणा चंदन, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष प्रदीप शेळके, सैय्यद वसीम, महेंद्र जाधव, गंगाधर तायडे, विजय बोराडे, ज्ञानदेव हरमकार, जुबेर पटेल, राजू शिंदे, राजू पन्हाळकर, जाबीर खान, सय्यद इम्रान, संदिप नवले, नितीन पुरभे, विलास बावस्कर, बाबुराव महाराज, रघुनाथ दिवाने, शेख हारून, शेख युनूस, संतोष शिंगणे, कैलास सोनोने, सय्यद ताज यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते व शेतकरी बांधव सहभागी होते. दरम्यान, बोराखेडीचे ठाणेदार भामरे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Buldhana news marathi news maharashtra news loan issue