नागपूर ते मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिकपर्यंतच; रेल्वे हेल्पलाइन हेल्पलेस

आशिष ठाकरे
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

रेल्वे अपघात झाला की रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुविधेसाठी तत्काळ मदत केंद्र निर्माण करत संपर्क करण्याचे आवाहन करते.

बुलडाणा : नागपूर येथे मुंबईकडे जाणार्‍या दुरांतो एक्स्प्रेसला मंगळवारी सकाळी झालेल्या अपघातात सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी, प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. यावर रेल्वे प्रशासनाने तत्काळ तीन स्थानकावर हेल्पलाइन केंद्र उभारत माहिती देण्यासाठी सुविधा करण्याचे व्टीट्र या सोशल मिडीयावर काही नंबर दिले. सदर नंबरवर संपर्क करुन सुविधा तपासणी केली असता नंबर कुणीही उचलत नसल्याचे आढळून आले आहे. 

रेल्वे अपघात झाला की रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुविधेसाठी तत्काळ मदत केंद्र निर्माण करत संपर्क करण्याचे आवाहन करते. परंतु, अनेकदा अशा प्रवाशांना वेळेवर सदर संपर्क केंद्रासोबत संपर्कच होत नसून, अनेकदा केवळ फोनची बेल ऐकरण्याशिवाय काहीच पर्याय शिल्लक राहत नाही. आजच्या आधुनिक युगात अपघातानंतर नातेवाईक व इतरांसोबत संपर्क वेळेवर होत नसल्यामुळे रोष व्यक्त होताना दिसत आहे. 

सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिकपर्यंतच
मुंबईच्या दिशेने तसेच तेथून भुसावळकडे येणार्‍या रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, याबाबत माहितीसाठी प्रभावी अशी यंत्रणाच रेल्वे प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. रेल्वे प्रशासनाने आतापर्यंत व्टिटर या सोशल मिडीयाच्या माध्यामातून सेवाग्राम एक्स्प्रेस (12140) ही 29 ऑगस्टला नाशिक रोड स्टेशनपर्यंत धावणार असून, तेथूनच परत येणार आहे. दरम्यान, परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी अद्यापही 24 ते 36 तास लागणार असून, पावसाची संततधार वाढत असल्यामुळे कार्यात अडथळा येत असल्याचे भुसावळ येथील अधिकार्‍यांनी सांगितले. 

अमरावती एक्स्प्रेस, विदर्भ एक्स्प्रेस
विदर्भातील प्रवाशांसाठी महत्त्वाच्या असलेल्या अमरावती एक्स्प्रेस तसेच विदर्भ एक्स्प्रेसबाबत आज (ता.29) दुपार दीड वाजेपर्यंतही कुठलीच माहिती नसल्यामुळे करण्यात आलेले रिझर्वेशन रद्द करावे का मार्ग बदलणार याबाबत काहीच माहिती नसल्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाल्याचे दिसून येत आहे. याबाबत भुसावळ येथील ट्रॉफिक कंट्रोल रुमलाही संपर्क केला असता त्यांनी माहितीच नसल्याचे सांगितले.

Web Title: buldhana news nagpur mumbai sevagram only till nashik