'कृषी विभागाच्या योजनांना गती देऊन निधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा'

श्रीधर ढगे
बुधवार, 21 मार्च 2018

कृषीमंत्र्यांनी सांगितले की, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून अतिरिक्त ९५ कोटी रुपयांचा निधी सूक्ष्म सिंचनासाठी देण्यात येणार असून मे अखेरपर्यंत तो खर्च करण्याची परवानगी आहे.

खामगाव : कृषी विभागासाठी केंद्र व राज्य पुरस्कृत निधीच्या खर्चाचा आढावा घेण्यासाठी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज मंत्रालयात बैठक घेतली. आयुक्तालयाने केलेल्या सादरीकरणात या वर्षी विभागाचा सुमारे 75 टक्के निधी खर्च झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.

शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांच्या कामांना गती देतानाच प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत निधी पोहोचला पाहिजे. वर्षभरात उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानाच्या माध्यमातून शेतीचे यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणावर झाले असून गटशेतीला चालना मिळाली आहे. भविष्यात पीक संरक्षण आणि मृद आरोग्य पत्रिका वाटपाची मोहिम हाती घेण्याचे आवाहन कृषी मंत्र्यांनी यावेळी केले.

बैठकीस विभागाचे अपर मुख्य सचिव विजय कुमार, आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह उपस्थित होते. यावेळी कृषी मंत्र्यांनी केंद्र पुरस्कृत तसेच राज्य पुरस्कृत योजनांचा सविस्तर आढावा घेतला. कृषी विभागासाठी आतापर्यंत 75 टक्के खर्च करण्यात आला असून केंद्र पुरस्कृत योजनांवर 83 टक्के इतका खर्च झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

कृषीमंत्र्यांनी सांगितले की, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून अतिरिक्त ९५ कोटी रुपयांचा निधी सूक्ष्म सिंचनासाठी देण्यात येणार असून मे अखेरपर्यंत तो खर्च करण्याची परवानगी आहे.

उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत यांत्रिकीकरणाला चालना मिळाली आहे. या मोहिमेत वर्षभरात 8 हजार 322 ट्रॅक्टर आणि 9 हजार 900 पॉवर ट्रिलर वाटप करण्यात आले आहे. शेड नेट, कांदा चाळीसाठी निधी कमी पडू देऊ नका असे सांगतानाच यावर्षी कांदा चाळींवर 112 कोटी रुपये खर्च करुन 13 हजार कांदा चाळी तयार करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, पीक कीड रोग संरक्षण, गटशेती, जमीन आरोग्य पत्रिका, जिल्हा कृषी महोत्सव याबाबत कृषी मंत्र्यांनी सविस्तर आढावा घेतला. उर्वरित निधी जास्तीत जास्त खर्च होण्यासाठी गती देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Web Title: Buldhana news Pandurang Fundkar statement on farmer aid