एका लाखांचे शौचालय झाले 60 हजाराचे

toilet
toilet

बुलडाणा : राज्यासह देशात सर्वत्र स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कोट्यवधीचा खर्च करण्यात येत असला तरी, कागदीघोडे नाचवीत या अभियानाला थेट प्रशासनाने बगल दिल्याचे आता समोर आले आहे. याबाबत गेल्या वर्षभरापासून बांधकाम होत असलेल्या चिखली तालुक्यातील दहिगाव येथील एकाच शौचालय तब्बल एक लाखाचे झाल्यासंदर्भात सर्वांत प्रथम सकाळ ने पाठपुरावा केल्यानंतर झोपी गेलेल्या पंचायत समिती प्रशासनाने जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या सहाय्यक अभियंता यांच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश दिले. याबाबत प्राथमिक चौकशी अहवालानुसार 44 हजार रुपयांची वसुली करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. 

संपूर्ण जिल्ह्यासह राज्य आणि केंद्र पातळीवर शौचालय बांधण्यासाठी मोठ्याप्रमाणात शासन अनुदान देत बांधकाम आणि वापर करण्यासंदर्भात जनजागृती करताना दिसून येत आहे. लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी 12 हजार तर ग्रामपंचायतच्या आवारात एक शौचालय बांधण्यासाठी तब्बल एक लाख 4 हजार 700 रुपयांचा निधी काढण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार चिखली तालुक्यातील दहिगाव येथे घडला असून, यासाठी गावातीलच चरणदास गवई यांनी कारवाईसाठी तब्बल एक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही झोपी गेलेल्या प्रशासकीय अधिकार्‍यांना जाग आली नव्हती. याबाबत 6 सप्टेंबरला सकाळ ने वृत्त प्रकाशित करताच प्रशासनाने जिल्हा परिषद सहाय्यक अभियंता यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. यानंतर 7 सप्टेंबरला चौकशी करण्यात आली असता 14 व्या वित्त आयोग निधीतून शौचालयाचे बांधकाम करणे प्रस्तावित असताना यामध्ये कामाचा वाव या बाबीअंतर्गत मुत्रीघरही समाविष्ट करण्यात आले असून, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागीय अभियंता चिखली यांनीही एक लाख 4700 रुपयांची बांधकामासाठी तांत्रिक मंजूरात दिली. सदर शौचालयाची चौकशी अहवाल सहाय्यक अभियंता यांनीही सुकीचा व खोटा अहवाल करत तक्रारकर्त्यांची पुन्हा दिशाभूल केली आहे.

सहाय्यक अभियंता यांनी दिलेल्या अहवाल मुतारीचा व शौचालयाचा गिलावा (भर्ती) हा शाळेने सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत 2008-09 मध्ये मुतारीचे बांधकाम व गिलावा टाकलेला आहे. परंतु, चौकशीमध्ये शौचालयाची किंमत वाढावी यासाठी चक्क सहा हजार 637 रुपयांची किंमत दर्शविण्यात आली आहे. पाण्याची टाकी व पाइप हे तीन हजार 500 रुपये किंमतीचे असताना त्याचे बिल सात हजार 920 रुपये वाढविण्यात आले आहे. वॉश बेसिंग 500 रुपयाचे असताना त्याचे बिल चार हजार 50 इतके दाखविण्यात आले आहे. चौकट व दरवाजा चार हजार 989 रुपयांचा दाखविण्यात आल्याने एखाद्या पंचतारांकित हॉटेलचे शौचायल तर नाही ना अशी परिस्थिती येथे निर्माण झाली आहे. गेल्या वर्षभरापासून ग्रामपंचायत शौचायल प्रकरणी वारंवार निवेदन आणि आंदोलन केल्यानंतरही प्रकाराचा छडा लागत नसल्यामुळे मोठा घोळ असल्याचा संशय आता व्यक्त करण्यात येत आहे. सहाय्यक अभियंता यांनी 44 हजारांची वसुली याप्रकरणी काढली असली तरी, साहित्यांची वास्तविक किंमत आणि बाजारातील बिलनुसार किंमत यात मोठी तफावत आढळून येत आहे. याप्रकरणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आल्यानंतरही कारवाईचा तिढा कायम असून, अधिकारी केवळ टोलवाटोलवी करत आहे. 

गावातील शौचायल बांधकामात मोठ्याप्रमाणात आर्थिक घोळ झाला असून, जर वास्तविक शौचायलयाला 60 हजार रुपये लागत असतील तर मग राज्य आणि केंद्र शासन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत लाभार्थ्यांची फसवूणक करत आहे. त्यांनीही 12 हजार ऐवजी 60 हजार रुपये प्रत्येकाला देणे गरजेचे आहे. सदर प्रकारात अधिकार्‍यांनी भ्रष्ट्राचार केला असून, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा देईल. 
- चरणदास गवई, तक्रारकर्ते, दहिगाव. 

दहिगाव येथील शौचालयसंदर्भात तक्रार आल्यानंतर जिल्हा परिषद सहाय्यक अभियंता यांच्या मार्फत चौकशी करण्यात आली आहे. त्यानुसार 44 हजार रुपये वसुली निघाली असून, त्यावेळी घेतलेली तांत्रिक मान्यता आणि वास्तविक खरेदी रेकॉर्ड पाहिल्यानंतरच प्रकरण समोर येईल. ग्रामपंचायतच्या वतीने अद्याप रेकॉर्ड सादर करण्यात आलेले नाही. यामध्ये ग्रामसेवकांचे वेतन वाढ थांबविण्यात आली आहे. ग्रामपंचायतच्या वतीने कामात अनियमितता आणि उशीर झाल्यामुळे किंमत वाढल्याचे सांगण्यात आले आहे. तरी, यासंदर्भात चौकशी करण्यात येत आहे. 
- सूर्यकांत भुजबळ, गटविकास अधिकारी, चिखली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com