खामगावातून चोरी गेलेले बाळ दिल्लीत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

बुलडाणा - खामगाव येथील सामान्य रुग्णालयातून चोरी गेलेल्या बाळाचा शोध घेण्यात बुलडाणा पोलिसांना यश आले आहे. सदर बाळ दिल्ली येथे सुरक्षित असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक शशिकुमार मीना यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणातील सहा आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे.

बुलडाणा - खामगाव येथील सामान्य रुग्णालयातून चोरी गेलेल्या बाळाचा शोध घेण्यात बुलडाणा पोलिसांना यश आले आहे. सदर बाळ दिल्ली येथे सुरक्षित असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक शशिकुमार मीना यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणातील सहा आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे.

वडनेर भोलजी येथील सुमैयाबी आतिक खान ही महिला 23 सप्टेंबरला बाळंतपणासाठी खामगाव रुग्णालयात भरती झाली होती. त्याच दिवशी तिने एका मुलाला जन्म दिला. दरम्यान, 27 सप्टेंबरला ती आपल्या बाळासह झोपलेली असताना पहाटे तिच्या बाळाला अज्ञात चोरट्याने पळवून नेले होते. याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पोलिस निरीक्षक प्रताप शिखरे यांच्याकडे तपास देऊन आवश्‍यक सूचना दिल्या.

या तपासासाठी तीन वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक माहितीवरून बाळ चोरताना वापरलेल्या वाहनाचा सहायक पोलिस निरीक्षक मनोज केदारे यांच्या पथकाने शोध घेतला. यासाठी औरंगाबादला त्यांनी राजे जहॉंगीर खान (वय 40) व त्याला भाड्याने वाहन उपलब्ध करून देणारा इरफान खान रशीद खान (रा. औरंगाबाद) यांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी हिसका दाखविताच त्यांनी खामगाव येथून लहान बाळ आणण्यासाठी औरंगाबाद येथील मोहसीन नावाची व्यक्ती व त्याची पत्नी खामगाव येथे शासकीय रुग्णालयात आल्याचे सांगितले. सदर वाहनचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे मोहसीन व त्याच्या पत्नीला समजताच दोघेही फरार झाले. आरोपी रेल्वेने पुण्याकडे जात असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी मोहसीन हुसेन खान (रा. सिल्लोड) व त्याची पत्नी प्रीती दाविद गायकवाड (पिल्ले) यांना पकडून ताब्यात घेतले. पळवून नेलेले बाळ दिल्ली येथे असल्याची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक मनोज केदारे व पोलिस उपनिरीक्षक दिनकर गोरे आपल्या पथकासह दिल्लीला रवाना झाले.

Web Title: buldhana vidarbha news crime