रस्ते उठले लोकांच्या जिवावर

अरुण जैन
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

शहर असो की ग्रामीण भाग सध्या बुलडाणा विधानसभा मतदारसंघात रस्ते ही मोठी डोकेदुखी बनली आहे. त्यामुळे जनजीवन पार विस्कळीत झाले आहे. बुलडाणा-अजिंठा, बुलडाणा-औरंगाबाद हे प्रमुख मार्ग बंद असल्याने एकीकडे ग्रामीण जनतेची ससेहोलपट होत आहे, तर दुसरीकडे सव्वा लाखावर लोकसंख्येचे बुलडाणा शहर रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे हैराण आहे.

बुलडाणा : बुलडाणा ते अजिंठा मार्गाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. हे काम सुरू असताना बुलडाणा ते पाडळीदरम्यान पुलाचे काम सुरू आहे. कंत्राटदाराने पावसाळ्याचा अंदाज घेऊन पर्यायी रस्ता व्यवस्थित न केल्याने पहिल्याच पावसात हा रस्ता वाहून गेला. त्यावेळी सुमारे 15 दिवस या मार्गावरील वाहतूक बंद होती. आता दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने पुन्हा हा तात्पुरता बनविलेला रस्ता वाहून गेल्याने बुलडाणा-अजिंठा मार्गाचा संपर्क तुटला आहे. परिसरातील ग्रामीण भागातील जनतेला रुग्णसेवा किंवा इतर कामांसाठी बुलडाण्याला यावे लागते. त्यांना आता 10 ते 15 किलोमीटरचा फेरा मारून वेगळ्या रस्त्याने यावे लागत आहे. हीच बाब बुलडाणा ते औरंगाबाद रस्त्याची झाली आहे. पहिल्याच पावसात वाहून गेलेला बुलडाणा व औरंगाबाद मार्गावरील म्हसलाजवळील नदीवरील पुलाचे काम चालू असल्याने तेथेही तात्पुरता रस्ता बनविण्यात आला होता. तोदेखील पावसाने पाण्याचे वाहून गेला यामुळे बुलडाण्यासह ग्रामीण परिसराचा औरंगाबादशी असलेला संपर्क तुटला आहे. बुलडाण्यातून अनेक रुग्णांना दररोज औरंगाबाद रेफर केले जाते. त्यांना आता चिखली मार्गे दूरच्या रस्त्याने जाऊन आर्थिक भुर्दंड, मनस्ताप व वेळेचा अपव्यय सहन करावा लागत आहे. एकंदरीत ग्रामीण भागातील जनता सध्या रस्त्याच्या समस्येने हैराण आहे. बुलडाणा शहराची अवस्था ही फारशी समाधानकारक नाही. शहरातील एखादा अपवाद वगळता इतर सर्व रस्ते खड्डेमय झाले आहेत. पावसाने नगरपालिकेच्या कामांचे पितळ उघडे पाडावे, त्याप्रमाणे एकेका रस्त्यावरील शेकडो खड्डे चुकवत दुचाकी व चारचाकीधारकांना कसरत करावी लागत आहे. त्यात नगरपालिकेने मुख्य शहरातील जनता चौकच बंद करून टाकला आहे. पंधरा दिवसांपासून परिसरातील जनतेला, व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. एकंदरीत एकीकडे पाऊस चांगला होत असला तरी शहरातील व ग्रामीण भागातील दळणवळण ही बुलडाणेकर व ग्रामीण जनतेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.

पावसामुळे व्यत्यय
बुलडाणा शहरातील जनता चौक व इतर रस्त्याची कामे करण्यासाठी पावसाचा मोठा व्यत्यय येत आहे. शिवाय नगरपालिका आमच्या (भारिप बहुजन महासंघ) ताब्यात असल्याने सत्ताधारी मंडळी निधी देताना भेदभाव करीत आहे.
- नजमुन्नीसा मो. सज्जाद, नगराध्यक्ष, बुलडाणा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: buldhana vidhansabha constituency article