Vidhan Sabha 2019 : बुलडाणा मतदारसंघात "बिग फाईट'

File photo
File photo

मोताळा (जि. बुलडाणा) : बुलडाणा विधानसभा मतदारसंघात एकूण 7 उमेदवार रिंगणात असले तरी चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन प्रमुख उमेदवारांनी बंडाचे झेंडे फडकावल्यामुळे निवडणुकीची समीकरणे बदलली आहे. त्यातच प्रमुख राजकीय पक्षांना अंतर्गत गटबाजीने पोखरले आहे. त्यामुळे या "बिग फाईट'मध्ये कोण बाजी मारणार, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.
कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या वतीने आमदार हर्षवर्धन सपकाळ निवडणूक रिंगणात आहेत. मागील पाच वर्षांतील विकासकामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडून ते मतांचा जोगवा मागताना दिसत आहेत. "एक भला माणूस' या इमेजवर मागील वेळी श्री. सपकाळ यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांवर मात केली होती. यंदा कॉंग्रेसकडून जयश्री शेळके या उमेदवारीसाठी इच्छुक होत्या. मागील पाच वर्षांत शेळके यांनी मतदारसंघात तगडा जनसंपर्क ठेवला व कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली. जयश्रीताईंना मानणारा भला मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. परंतु, कॉंग्रेसने त्यांना उमेदवारी दिली नसल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी दिसून आली. त्यामुळे कॉंग्रेसला गटबाजी पोखरते की काय, अशी शक्‍यता वर्तवली जात असताना, जयश्रीताई शेळके, संजय राठोड, विजय अंभोरे अशी कॉंग्रेसची मातब्बर नेते मंडळीने या मतदारसंघातील प्रचाराकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीमुळे कॉंग्रेस महाआघाडीच्या पारंपरिक व्होट बॅंकेला सुरुंग लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांची डोकेदुखी वाढली असून, त्यांना विजयश्री खेचून आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. शिवसेना-भाजप महायुतीकडून शिवसेनेचे संजय गायकवाड यांनी धनुष्यबाण खांद्यावर घेतला आहे. संजय गायकवाड यांनी तीनदा विधानसभा निवडणुकीत भाग्य आजमावले असून, थोड्या फरकाने विजयला गवसणी घालण्यात हुकले आहे. तरुणाईची मोठी फळी त्यांच्या जमेची बाजू आहे. खासदार प्रतापराव जाधव त्यांच्या विजयासाठी जिवाचे रान करताना दिसत आहे.
परंतु, मित्रपक्ष भाजपचे बंडखोर नेते योगेंद्र गोडे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहे. त्यांच्या दिमतीला भाजपमधील अनेक मातब्बर मंडळी व कार्यकर्त्यांनी प्रचारात उडी घेतली. योगेंद्र गोडे यांच्या प्रचाराच्या बॅनरवर भाजपचे राष्ट्रीय नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप नेते एकनाथराव खडसे या दोघांचे फोटो झळकले होते. या सर्व परिस्थितीमुळे मतदारांमध्ये संभ्रमावस्था असून, महायुतीचे उमेदवार संजय गायकवाड यांची डोकेदुखी वाढली आहे. गोडे यांनी मागील पाच वर्षांत केलेली संघटनात्मक बांधणी त्यांच्या जमेची बाजू आहे. शिवसेनेची उमेदवारी न मिळाल्याने माजी आमदार विजयराज शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र ठोकून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेऊन उमेदवारी पदरात पाडून घेतली. विजयराज शिंदे व संजय गायकवाड यांच्यातील हाडवैर सर्वश्रुत आहेच. शिंदे यांनी पाच वेळा विधानसभा निवडणूक लढवून तीनवेळा विजय मिळविला. आपल्या कारकिर्दीत केलेला विकासकामांचा आलेख ते जनतेसमोर मांडत आहेत. परंतु, शिवसेनेने भरभरून दिल्यावरही श्री. शिंदे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याने कट्टर शिवसैनिक शिवसेनेच्या पाठीशी असल्याचे बोलल्या जात आहे.
बुलडाणा येथील नगराध्यक्ष पती मो. सज्जाद यांना वंचितची उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी एमआयएमच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. तर, बसपकडून अब्दुल रज्जाक ऊर्फ बबलू सेठ निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. या दोघा उमेदवारांमुळे कॉंग्रेस महाआघाडीला फटका बसण्याची शक्‍यता आहे.

लेवा समाजाकडे सर्वांचा कल
या मतदारसंघात लेवा पाटील समाजाचे जवळपास 28 ते 30 हजार निर्णायक मतदार आहेत. माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या इशाऱ्यावर लेवा समाज मतदान करीत असल्याचा इतिहास आहे. यंदा भाजपने मुक्ताईनगर मतदारसंघातून एकनाथराव खडसे यांना उमेदवारी नाकारून त्यांची मुलगी रोहिणी खडसे-खेवलकर यांना तिकीट दिले. याठिकाणी शिवसेनेने बंडखोरी केली आहे. त्यामुळे बुलडाणा मतदारसंघात लेवा समाज कोणती भूमिका घेणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com