घुंगरांचे आवाज थांबले! लॉकडाउनचा परिणाम बैलबाजारावरही

bull market
bull market

वरुड (अमरावती) :  घुंगरांचा आवाज,  बोटांच्या हालचालीवर होणारे व्यवहार, तीस हजारांपासून एक ते दीड लाखांपर्यंत लागणारी बैलजोडींची बोली, असे सगळे आवाज यंदा थांबले आहेत.
कोरोनामुळे तब्बल 70 वर्ष जुना इंग्रजकालीन ऐतिहासिक  राजुराबाजार शांत झाला आहे.
विदर्भातील सर्वांत मोठा बैलबाजार म्हणून राजुराबाजार येथील या बाजाराची ख्याती आहे. येथील बैलबाजार विविध जातींच्या बैलांसाठी प्रसिद्ध आहे. लगतच्या नागपूर, वर्धा या जिल्ह्यांसह मध्य प्रदेशातील पांढुर्णा, मुलताई आदी ठिकाणांवरून या ठिकाणी बैल विक्रीसाठी आणले जातात. तसेच शेतकरी, व्यापारीही खरेदीसाठी येतात.
30 ते 35 हजारांपासून ते एक सव्वा लाखापर्यंतची बैलजोडी या बाजारात विक्रीसाठी येते. शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने शेतकरी मोठ्या संख्येने गुरांच्या या बाजारात हजेरी लावतात. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा वैभवशाली परंपरा असलेला 70 वर्षांचा बाजार नित्यनेमाने भरतो. पण गेल्या दोन महिन्यांपासून तो सुना झाला आहे. दिवसभर जनावरांच्या विक्रीने गजबजलेला हा बाजार आता शांत आहे. ना गुरांच्या हंबरण्याचा आवाज, ना गळ्यातील घुंगरांचा किणकिणाट, सारे काही कोरोनामुळे लॉकडाउन झाले आहे.
शेतक-यांची अडचण वाढली
बैलबाजार बंद असल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. एकीकडे खरीप हंगाम तोंडावर आहे, मशागतीची सुरुवात झाली, अशावेळी बहुतेक शेतकरी बैल खरेदी करतात. त्या दोन सवंगड्यांच्या साथीने हिरवं शिवार फुलते. यंदा मात्र शेतकऱ्यांना बैल मिळणे दुरापास्त झाले आहे. परिणामी यंदाची मशागत यंत्राच्या साहाय्याने करण्याची वेळ आली आहे. बैलजोड्यांची संख्या कमी असल्याने आता पुढील नियोजन, वखरणी, पेरणी, डवरणीसारखी कामे करताना अडचणी येणार आहेत. वेळेच्या आत ही कामे झाली नाही तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. शिवाय आर्थिक भारही सहन करावा लागणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे बळीराजाची चिंता अधिकच वाढली आहे.
शासकीय आदेशानुसार बाजार बंद करण्यात आला आहे. शेतीच्या मशागतीसाठी बैलांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होत असते, मात्र बाजार बंद असल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत. बाजार सुरू करण्याचे आदेश येताच पूर्ववत सुरू होईल.
नंदकिशोर बोडखे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, वरुड
किंमतीही वाढल्या

खरिपाच्या मशागतीसाठी बैलाची गरज असते, मात्र यावर्षी बाजार बंद असल्याने बैल मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. शिवाय बैलजोड्यांची किंमतही वाढली आहे. खरीप हंगामावर याचा परिणाम होईल. बैलजोड्यांची संख्या घटल्याने पेरणी व डवरणीवर परिणाम होईल.
सुनील गावंडे, शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com