स्पाय कॅमेरे लागलेला ‘बुलेटप्रूफ’ गणवेश

स्पाय कॅमेरे लागलेला ‘बुलेटप्रूफ’ गणवेश

नागपूर - सद्य:स्थितीत उपलब्ध असलेले ‘बुलेट प्रूफ जॅकेट्‌स’ सैनिकांच्या खांद्यापासून ते कमरेपर्यंतच्या भागाचे संरक्षण करतात. नागपूरमधील आशुतोष महाजन आणि श्रुती नारनवरे या युवा अभियंत्यांनी तब्बल १५ महिन्यांच्या परिश्रमानंतर तीन स्पाय कॅमेरे आणि जीपीएस चीप असलेला ‘बुलेटप्रूफ’ गणवेश तयार केला आहे. हा गणवेश डोक्‍यापासून ते पायापर्यंत संपूर्ण शरीराचे संरक्षण करेल, असा दावा या अभियंत्यांनी केला.  हा गणवेश परिधान केलेली व्यक्ती कुठे आहे, काय करीत आहे आणि त्याच्या आजूबाजूला काय घडत आहे, याची इत्थंभूत माहिती जीपीएसद्वारे कंट्रोल रूममध्ये कळेल. त्यामुळे अचानक उद्‌भवलेल्या परिस्थितीवरही नियंत्रण मिळविणे सहज शक्‍य होईल.

सीमेवर लढणारे सैनिक आणि वारंवार चकमकी होणाऱ्या ठिकाणी कार्यरत पोलिसांसाठी हा गणवेश जीवनरक्षक ठरणार आहे. या जीवनरक्षक गणवेशाचे वजन केवळ साडेतीन ते चार किलो आहे. बोरन, कार्बाईट आणि  सिरॅमिक प्लेटपासून हा गणवेश तयार केलेला आहे. 

या दोन अभियंत्यांनी ऑगस्ट २०१५ मध्ये हे शोधकार्य सुरू करून नोव्हेंबर २०१६ मध्ये संपूर्ण गणवेश तयार केला. सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या जॅकेटची किंमत ३५ हजार रुपये आहे. पण, या संपूर्ण गणवेशाची किंमत ३० हजार रुपये राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चंडीगडला परीक्षण
चंडीगड येथील सिक्‍युरिटी रिसर्च सेंटरमध्ये नोव्हेंबरमध्ये या गणवेशाचे परीक्षण झाले. त्यानंतर भारतीय सैन्याने हा गणवेश वापरावा, यासाठी संरक्षण मंत्रालयाकडे आशुतोष आणि श्रुती यांनी प्रस्ताव सादर केला आहे. सध्या पेटंट मिळविण्यासाठी त्याची कार्यवाही सुरू आहे. त्यानंतर हा गणवेश भारतीय सैन्यात आणि पोलिस विभागात वापरला जाईल, असा विश्‍वास या युवा अभियंत्यांनी व्यक्त केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com