घरफोडी करणारा निघाला रेल्वेतील मोबाईल चोर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

चंद्रपूर : घरफोडी करणाऱ्याचा शोध घेत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोहोचले. घरात छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले. चार दिवसांची पोलिस कोठडी घेतली. पोलिसांनी मोबाईलसह घरफोडीतील सुमारे दोन लाख 63 हजार 500 रुपयांचे सोन्या, चांदीचे दागिने जप्त केले. शूभम निमगडे (वय 29) असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे.

चंद्रपूर : घरफोडी करणाऱ्याचा शोध घेत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोहोचले. घरात छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले. चार दिवसांची पोलिस कोठडी घेतली. पोलिसांनी मोबाईलसह घरफोडीतील सुमारे दोन लाख 63 हजार 500 रुपयांचे सोन्या, चांदीचे दागिने जप्त केले. शूभम निमगडे (वय 29) असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे.
मूल तालुक्‍यातील गोंडसावरी येथील शूभम निमगडे हा चंद्रपुरातील बाबूपेठ येथे किरायाने राहत आहे. त्याने शास्त्रीनगर परिसरात घरफोडी केली. त्याच्याविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या नेतृत्वात घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्याची मोहीम सुरू आहे. शूभम हा बाबूपेठ परिसरात असल्याची माहिती मिळताच एलसीबीचे पथक पोहोचले. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन चार दिवसांची पोलिस कोठडी मिळविली. त्याने चौकशीत शास्त्रीनगरात घरफोडी केल्याची कबुली दिली. तसेच बल्लारपूर-सेवाग्राम मार्गाने धावणाऱ्या रेल्वेतील प्रवाशांचे मोबाईल चोरल्याचे सांगितले. आतापर्यंत एकूण 17 मोबाईल चोरल्याची माहिती त्याने दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याने दिलेल्या घटनास्थळावरून 17 मोबाईल, 32 ग्रॅम सोने, 10 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण दोन लाख 63 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
चोरीचा प्रवास "बल्लारपूर-सेवाग्राम'
घरफोडी करणारा शूभम निमगडे याने बल्लारपूर ते सेवाग्राम या मार्गाने धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना टार्गेट केले. या मार्गाने प्रवास करणारे प्रवासी मोबाईल चार्जिंग लावून झोपले असल्याची संधी साधून तो मोबाईल लंपास करीत होता. मागील पाच ते सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. त्याने चक्क रेल्वेतून 17 मोबाईल चोरल्याची कबुली दिली. अखेर, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Burglary: Mobile thief on the train leaving