बस फोडण्याचा क्रम सुरूच

Bus-Damage
Bus-Damage

नागपूर - हलबा समाजातील तरुणांकडून बस फोडण्याचा क्रम आजही सुरूच राहिला. मंगळवारी रात्री रेशीमबाग, पारडी येथे परिसरात दगडफेक करीत दोन बसच्या काचा फोडण्यात आल्या. सोमवारी रात्रीसुद्धा वैशालीनगरात एक बस फोडण्यात आली. दरम्यान, उपोषणकर्ते कमलेश भगतकर यांची प्रकृती ढासळली. अजूनही शासनाकडून अपेक्षित निर्णय घेतला जात नसल्याने समाजाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हलबा समाजाला संविधानदत्त अधिकार मिळण्यासह वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी हलबा क्रांती सेनेने १५ नोव्हेंबरपासून गांधीबागेतील रा. बा. कुंभारे पुतळा परिसरात अनिश्‍चितकालीन उपोषण सुरू केले आहे. सोमवारी या आंदोलनाला हिंसक वळन लागले. समाजातील तरुणांनी दोन ठिकाणी बसेसची तोडफोड करीत शासनाविरोधातील रोष व्यक्त केला. मंगळवारी रात्री पुन्हा रेशीमबागेत श्रीकृष्णनगरकडे जाणाऱ्या आपली बसला लक्ष्य करून काचा फोडण्यात आल्या. त्यानंतर पारडी येथेही बसला लक्ष्य करण्यात आले. तसेच वैशालीनगरातील बस फोडण्यात आली. 

हलबा क्रांती सेनेचे अध्यक्ष प्रमलाल भांदककर आणि जगदीश खापेकर यांच्या नेतृत्वात कमलेश भगतकर यांनी अनिश्‍चितकालीन उपोषण सुरू केले आहे. आज सहाव्या दिवशी त्यांची प्रकृती ढासळली. रक्तदाब सामान्यापेक्षा फारच कमी झाला असून रक्तशर्करेचे प्रमाण धोक्‍याच्या पातळीवर पोहोचले आहे. यानंतरही भगतकर उपोषणावर ठाम आहेत. समाजाला न्याय मिळेपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

मंगळवारी सायंकाळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे प्रमुख आणि माजी आमदार वामनराव चटप यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

प्रशासनाकडून चर्चेचा प्रस्ताव
सहा दिवसांपासून दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला समाजाचा रोष लक्षात घेता अखेर आंदोलनाची दखल घ्यावी लागली आहे. प्रशासनाने चर्चेची तयारी दाखवीत उपोषणस्थळी येण्याबाबतची सूचना दिल्याची माहिती आंदोलकांनी दिली. शासनाच्या आदेशानुसार ही चर्चा होणार असल्याचे कळविण्यात आले असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, रात्रीपर्यंत अधिकारी आंदोलनस्थळी पोहोचले नव्हते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com