आता बोंबला; ऐन जंगलात झाली बस "फेल'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

  • हिंगणा तालुक्‍यातील अडेगाव जंगलातील घटना
  • चालक व वाहकाची कसरत
  • देखभाल दुरूस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

हिंगणा (जि.नागपूर) : "हम-तुम एक कमरे में बंद हो, और चाबी खो जाये' हे चित्रपटातील गाणं सर्वांनी ऐकलं असेल. परंतु, प्रत्यक्षात जीवनात असा प्रसंग आला, तर मोठी फजिती होते. अशावेळी घडणाऱ्या घटनेतील परिस्थितीशी जुळवून घेणेच आपल्या हाती उरते. अंधारी रात्र, आजबाजूला कीर्र काळोख, घनदाट जंगलातून बसमध्ये प्रवास सुरू असताना अचानक बसमध्ये बिघाड होतो; पुढे काय? तर निरूपाय... अशाच प्रकारची घटना हिंगणा तालुक्‍यातील मोहगाव ढोले मार्गावर मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली.

लोकवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाची नागपूर आगाराची बस अडेगाववरून नागपूरला येताना मोहगाव ढोले मार्गावर जंगलात "गिअर फेल' झाल्याने बंद पडली. जंगलाच्या मधोमध "गिअर फेल' झाल्याने चालक व वाहकाची चांगलीच तारांबळ उडाली. नागपूर गणेशपेठ बसस्थानकावरून अडेगावकरिता दुपारी अडीचला बस निघाली. अडेगाववरून नागपूरकडे परतीच्या प्रवासाला जात असताना मोहगाव ढोले जंगलाच्या मार्गावर गिअर फेल झाल्याने बस बंद पडली. जंगलाच्या मधोमध बस बंद पडल्याने चालक सुधाकर ठाकरे व वाहक प्रकाश माहुरे यांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यांनी घाट रोडवरील कार्यशाळेत घटनेची माहिती दिली. बसमध्ये नागपूरला जाणारे दोन प्रवासी होते. सध्या "वाघ आलारे, वाघ गेला रे' अशी ओरड सुरू आहे. मिहान परिसरातील आजूबाजूच्या परिसरात वाघ "मुक्‍कामी' असल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. परिवहन महामंडळाच्या बसेसची देखभाल दुरुस्ती वेळेवर होत नसल्याने अशा घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. बाहेरगावी जाणाऱ्या बसची तपासणी होणे गरजेचे आहे. बसेस बंद पडल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bus fails in forest