लालपरीची एन्ट्री, एक्‍झीट खड्ड्यातून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

नागपूर : राज्याची लोकवाहिनी असलेल्या एसटीला खासगी स्पर्धकांसोबतच प्रशासकीय दिरंगाईचासुद्धा सामना करावा लागत आहे. अपुऱ्या सुविधानंतरही प्रवासी एसटीवर जीव ओवाळतात. गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकावर होणाऱ्या गर्दीवरून ते लक्षातही येते. परंतु, परिसराची योग्य देखरेख होत नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. बसस्थानकाच्या आतील भागातील रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने लालपरीला खड्ड्यातूनच एन्ट्री आणि एक्‍झीट करावी लागत आहे. यामुळे हीच का स्मार्ट सिटी? असा बोचरा सवाल प्रवासी उपस्थित करीत आहेत.
एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या सेवेसाठी अशी बिरुदावली मिरवली जाते. प्रत्यक्षात चित्र वेगळेच आहे. अगदी उपराजधानीतील मध्यवर्ती बसस्थानकसुद्धा उपेक्षित असल्याचे चित्र आत पाय टाकताच दिसून येईल. आतील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. बऱ्याच ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. चालकाने कितीही प्रयत्न केला तरी एक्‍झीट गेटमधून निघताना खड्ड्यातून बस उसळल्याशिवाय राहत नाही. अगदी रस्त्यावर खड्डा असल्याने बरेचदा बेसावध प्रवासी पडतातही. प्रवाशांची पडझड हा रोजचाच सिलसिला झाला आहे. एन्ट्री गेटचीही तिच गत आहे. अलीकडे मुख्य एन्ट्रीगेट बंद करण्यात आले असून पार्किंगच्या जागेवरून नवीन रस्ता काढण्यात आला आहे. यामुळे या मार्गाने जाताना गाड्या खड्ड्यात आदळण्याच्या घटना थांबून प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आत येताना किंवा बाहेर पडताना गाडी उसळ्या घेत असल्याने प्रवाशांकडून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bus, roads are bad in condition