शेतकऱ्यांची आर्थिक लूट, खुल्या बाजारात कमी भावाने खरेदी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

नागपूर : द्विदल धान्याची कापणी व मळणी सुरू झाली असून माल बाजारपेठेत येत आहे. मात्र, अद्याप हमीभाव केंद्र खुली झाली नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे. ही लूट थांबविण्यासाठी शासनाने ठिकठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

सोयाबीन, मूग, उडीद या शेतमालाची बाजारातील आवक हळूहळू वाढत आहे. केंद्र शासनाने यावर्षी सोयाबीनचा हमीभाव प्रतिक्विंटल 3 हजार 710 रुपये, मुगाचा 7 हजार 70 रुपये व उडदाचा हमीभाव प्रतिक्विंटल 5 हजार 700 रुपये जाहीर केला आहे. हा शेतमाल आता बाजारात येत आहे. या तिन्ही शेतमालाचे खुल्या बाजारातील भाव हमीभावापेक्षा कमी आहे. हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणे हा कायद्याने गुन्हा असतानाही व्यापारी शेतकऱ्यांना हमीभाव देत नसल्याचे चित्र बाजारपेठेत दिसू लागले आहे. 
सोयाबीनला सरासरी तीन हजार रुपयांहून कमी भाव मिळत आहे.अशीच अवस्था मूग व उडदाची आहे. नियमानुसार शेतमालाचे भाव हमीभावापेक्षा कमी असल्यास सरकारने ते खरेदी करावे. यासाठी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करून या तिन्ही शेतमालाची खरेदी करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे राम नेवले, मधुसूदन हरणे, मदन कामडे, सतीश दाणी, उल्हास कोंटबकर, अरुण केदार, विनोद दुबे, सचिन डाफे यांनी केली आहे. 

कमी भावासाठी ओलाव्याचे कारण 
शासनाने "एफएक्‍यू' दर्जाच्या सोयाबीनमध्ये 12 टक्‍के ओलावा (मॉईश्‍चर) मान्य केला आहे. सध्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या सोयाबीनमध्ये 19 टक्‍के ओलावा आहे. खुल्या बाजारात याच ओलाव्याचे कारण पुढे करून प्रतिक्विंटल 700 रुपये भाव कमी दिला जात आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Buy at lower prices on the open market