पारशिवनीत कापसाची हमीभावाने खरेदी; शेतकऱ्यांमध्ये आनंद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये कापसाला 5 हजार 50 पेक्षा जास्त भाव देण्यात आलेला नाही, खासगी जिनिंगमध्येही फारशी चांगली परिस्थिती नाही.

पारशिवनी, (जि. नागपूर ) : येथील बाजार समितीच्या यार्डात कापूस खरेदीला सोमवारपासून सुरुवात झाली. सीसीआयच्या माध्यामातून कापूस खरेदी केला जात आहे. शेतकऱ्यांच्या कापसाची 5 हजार 550 रुपये क्विंटल दराने खरेदी करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

जिल्ह्यात कोणत्याही बाजार समिती यार्डमध्ये कापसाला हमीभाव मिळत नसताना पारशिवनी बाजारपेठेत हमीभाव दिला जात आहे हे विशेष. यापूर्वी पारशिवनी बाजारपेठेत सीसीआयच्या माध्यमातून खरेदी व्हावी व हमीभाव मिळावा यासाठी दैनिक सकाळने "कापसाला हमीभाव मिळेना' या मथळ्याखाली रविवार 1 डिसेंबरला वृत्त प्रकाशित केले होते, हे विशेष. या बातमीनंतर बाजार समितीचे सभापती अशोक चिखले व संचालकांनी पारशिवनी येथे सीसीआय केंद्र सुरू होताच हमीभाव मिळावा यासाठी प्रयत्न केले.

शेतकरी आनंदात

सोमवारी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमीभावानुसार शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीला सुरवात झाली. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीनुसार शेतमालाला भाव देण्यात आला. बाजार समितीचे सभापती अशोक चिखले यांच्या हस्ते बैलगाडीच्या पूजनाने कापूस खरेदीला सुरुवात झाली. कापसाला हमीभावपेक्षा जास्त भाव मिळाल्यामुळे शेतकरी आनंदात आहेत. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी कापूस विक्रीला आणावा, असे आवाहन केले आहे. 

पारशिवनीत शक्‍य; तर इतरत्र का नाही?

जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये कापसाला 5 हजार 50 पेक्षा जास्त भाव देण्यात आलेला नाही, खासगी जिनिंगमध्येही फारशी चांगली परिस्थिती नाही. दुसरीकडे पारशिवनी मार्केट यार्डमध्ये सीसीआय कापसाला हमीभावापेक्षा जास्त दर मिळाला आहे. यामुळे इतर बाजार समित्यांमध्ये व खासगी व्यापारी किंवा जिनिंगमध्येही हमीभाव मिळावा, अशी मागणी केली जात आहे. 

शेतकऱ्यांना हक्क मिळाला

शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी बाजार समिती नेहमीच प्रयत्नशील आहे. हमीभावाने खरेदी झाल्याने शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळाला आहे. 
- अशोक चिखले, सभापती, बाजार समिती, पारशिवनी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Buying cotton at a guaranteed price in Parshioni