धान खरेदी केंद्र आठ दिवसांपासून बंद; गोदामे झाली हाऊसफुल्ल; शेतकरी प्रतीक्षेत

टीम ई सकाळ 
Sunday, 10 January 2021

रेदी करण्यात आलेल्या शेतमालाची उचल होत नसल्याने गोदामे हाउसफुल्ल झाली आहेत. जिल्ह्यातील 27 पैकी 24 केंद्रे बंद असल्याची माहिती आहे.

मूल (जि. चंद्रपूर) ः खरीप हंगामातील धानाची वाढलेली आवक आणि शेतमाल ठेवण्यासाठी जागा शिल्लक नसल्याची अडचण यामुळे येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र बंद करण्यात आले आहे. मागील आठ दिवसांपासून केंद्रच बंद असल्याने जवळपास 883 शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित झाले आहेत. प्रतीक्षेतील शेतकरी यामुळे अडचणीत सापडला आहे. दुसरीकडे ढगाळ वातावरणाचाही परिणाम झाला आहे. खरेदी करण्यात आलेल्या शेतमालाची उचल होत नसल्याने गोदामे हाउसफुल्ल झाली आहेत. जिल्ह्यातील 27 पैकी 24 केंद्रे बंद असल्याची माहिती आहे.

अधिक वाचा - एकाचवेळी पाच बालकांना हातात घेऊन शूर परिचारिकेची आगीतून धाव, मेयोमधील घटनेची अनेकांना आठवण

मूल तालुका हा धानउत्पादक पट्टा म्हणून ओळखला जातो. येथील तांदळाचा व्यवसाय प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासकीय आधारभूत केंद्र उघडण्यात आले आहे. खासगी व्यापाऱ्यांसह येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धानाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचप्रमाणे धानाला शासकीय हमीभावही चांगला आहे. यंदा आधारभूत केंद्रातसुद्धा धानाची आवक महिन्याभराआधीच मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या केंद्राला चंद्रपूर तालुकाही जोडलेला आहे. 

शासकीय नियमानुसार आधारभूत केंद्रावर आपला शेतमाला विकण्यासाठी तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी नोव्हेंबर 2020 पासून नोंदणीकरिता अर्ज सादर केले आहेत. त्यानुसार आतापर्यंत एक हजार 151 अर्ज येथील खरेदी केंद्राला प्राप्त झाले. त्यापैकी फक्त 265 शेतकऱ्यांचे नऊ हजार 742.35 क्‍विंटल धान खरेदी करण्यात आले आहे. 

उर्वरित 886 शेतकऱ्यांचे अर्ज अजूनही प्रलंबित आहेत. खरेदी केंद्रावर धान खरेदी करण्याकरिता आणि खरेदी केलेले धान ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने मागील आठ दिवसांपासून हे खरेदी केंद्र बंद आहे. जागेअभावी आणि वातावरणातील बदलामुळे खरेदी केंद्र बंद असल्याने प्रलंबित अर्ज असलेल्या शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शेतमाल विकावे कुठे अशा संभ्रमावस्थेत शेतकरी सापडला आहे. काही शेतकरी आपला शेतमाल सरळ व्यापारांना विकून मोकळे होत आहेत.

नक्की वाचा - अनेक दिवसांपासून बंद असलेल्या घराचं शेजाऱ्यांनी उघडलं दार; पलंगाजवळील दृश्य बघून भल्याभल्यांचा उडाला थरकाप 

आधारभूत केंद्रावर धानाची आवक मोठया प्रमाणात वाढली. त्यामुळे गोदामे हाउसफुल्ल झाली आहेत. जिल्ह्यात 27 ठिकाणी आधारभूत केंद्रे आहेत. त्यापैकी मूल, सिंदेवाही, गोंडपिपरी, कोठारी, पोंभुर्णा, नागभीड, राजोली यासह इतर क्रेंदे जागेअभावी बंद करण्यात आली आहे. ढगाळ वातावरणामुळे शेतमाल बाहेर ठेवू नये अशा सुचना करण्यात आल्या आहेत.
अनिल गोगीरवार,
जिल्हा मार्केंटिग अधिकारी ,चंद्रपूर. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Buying of rice crops is stopped from last 8 days in chandrapur