"ब्योमकेश बक्षी'चे यश साधेपणामुळे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

नागपूर : खूप जास्त भूमिका केल्यानंतर अभिनयात एक मॅच्युरिटी दिसू लागते; पण साधेपणाचा अभाव असण्याची शक्‍यता अधिक असते. "ब्योमकेश बक्षी' या मालिकेत मुख्य पात्राचा साधेपणा यशाचे कारण ठरला, असे मत सुप्रसिद्ध अभिनेते रजित कपूर यांनी आज (सोमवार) येथे व्यक्त केले. "एक्‍स्प्रेशन्स' चित्रपट महोत्सवात प्रसिद्ध मुलाखतकार अजेय गंपावार यांनी त्यांना बोलते केले.

नागपूर : खूप जास्त भूमिका केल्यानंतर अभिनयात एक मॅच्युरिटी दिसू लागते; पण साधेपणाचा अभाव असण्याची शक्‍यता अधिक असते. "ब्योमकेश बक्षी' या मालिकेत मुख्य पात्राचा साधेपणा यशाचे कारण ठरला, असे मत सुप्रसिद्ध अभिनेते रजित कपूर यांनी आज (सोमवार) येथे व्यक्त केले. "एक्‍स्प्रेशन्स' चित्रपट महोत्सवात प्रसिद्ध मुलाखतकार अजेय गंपावार यांनी त्यांना बोलते केले.
सेंट उर्सुला शाळेच्या सभागृहात हा महोत्सव आयोजित करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ प्रकाशयोजनाकार व नेपथ्यकार गणेश नायडू यांचा रजित कपूर यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. या वेळी इनू मजुमदार, आरजे मिलिंद, शैलेश नरवाडे, सुदत्ता रामटेके यांची प्रमुख उपस्थिती होती. रजित कपूर म्हणाले, ""पंचवीस वर्षांपूर्वी "लव्ह लेटर्स' हे नाटक आम्ही करायचो आणि आजही करतोय. या नाटकाचा 1992 साली झालेला प्रयोग बघायला बासू चटर्जी आले होते. ते रंगमंचाच्या मागे येऊन मला भेटले आणि निघून गेले. काही दिवसांनी त्यांनी "ब्योमकेश बक्षी' या मालिकेचे सर्व 33 एपिसोड्‌स मला वाचायला दिले. अख्ख्या मालिकेचे स्क्रिप्ट आज कुणी तयार ठेवत असेल, यावर माझा विश्‍वास नाही. पण, बासूदांनी मला संपूर्ण स्क्रिप्ट वाचायला दिले होते. मी ते वाचून काढल्यावर लगेच होकार दिला आणि कामाला तयार झालो. या मालिकेचे चित्रीकरणही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने झाले होते. तो माझ्यासाठी एक मोठा अनुभव होता.'' या मालिकेचा प्रेक्षकांवर असा काही प्रभाव होता की, काही लोक साडेनऊच्या मालिकेसाठी साडेआठलाच दुकान बंद करून जायचे. याचे उदाहरण सांगताना रजित कपूर म्हणाले, ""त्या दिवसांमध्ये एकदा मी औषध घ्यायला मेडिकल स्टोअर्समध्ये गेलो, तर त्याने माझीच मालिका बघण्यासाठी दुकान बंद करून टाकले होते. पश्‍चिम बंगालमध्ये मी सहज कुठे निघालो तरी लोक माझ्या मागे यायचे. त्यांना वाटायचं मी जासुसी करायला जातोय. त्यांना सांगावं लागायचं की मी आता जेवायला जातोय.'' हे अनुभव ऐकल्यावर प्रेक्षकांमध्ये जोरदार हशा पिकला. "मेकिंग ऑफ महात्मा' या चित्रपटाचे अनुभवही रजित कपूर यांनी सांगितले. सूत्रसंचालन आरजे प्रीती हिने केले.
गणेश नायडूंना गहिवर
रजित कपूर यांनी गणेश नायडू यांना मानपत्र प्रदान केले. त्यानंतर रजित कपूर यांनी नायडू यांना वाकून नमस्कार केला. एवढेच नाही, तर त्यानंतर त्यांनी गणेश नायडू यांना आलिंगन देऊन रंगभूमीवरील सेवेबाबत कृतज्ञता व्यक्त केली. या प्रसंगाने गणेश नायडू यांना गहिवरले आणि प्रेक्षकांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला.
"रंगभूमीची प्रामाणिक सेवा केली'
"मी रंगभूमीची प्रामाणिक सेवा केली. आपण केलेले काम सर्वोत्तम असेल आणि ते कुणीही कॉपी करू शकणार नाही, यासाठी चोवीस तास स्वतःला झोकून दिले. आजपर्यंत असेच काम करतोय आणि अखेरच्या श्‍वासापर्यंत करत राहणार,' अशा भावना ज्येष्ठ रंगकर्मी गणेश नायडू यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केल्या.

Web Title: Byomkesh bakshi success news