केबल चालकांकडून ग्राहकांवर पॅकेजचा मारा  

केबल चालकांकडून ग्राहकांवर पॅकेजचा मारा  

नागपूर - भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नवीन नियमावलीप्रमाणे आवडीच्या वाहिन्यांची यादी देण्यावरून ग्राहक व केबल चालक तसेच डायरेक्‍ट टू होम (डीटीएच) सेवा पुरवठादार कंपन्यांमध्ये वादाचे प्रसंग घडू लागले आहेत. ग्राहकांना कोणत्या वाहिन्या पाहायच्या याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य ट्रायच्या निर्णयामुळे मिळाल्याचा दावा केला जात असताना व हेच या निर्णयाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य असताना केबल चालकांसह विविध डीटीएच कंपन्या त्यांच्या पसंतीच्या वाहिन्यांचे समूह (पॅकेज) विक्री करण्याचा निर्णय लादू लागल्याने ग्राहक व केबल चालकांमधे वाद होत आहेत.

ट्रायच्या निर्णयाप्रमाणे आवडीच्या वाहिन्या निवडण्यासाठी केबल चालक घरोघरी जाऊन ग्राहकांकडून त्यांच्या आवडीच्या चॅनेलची लिस्ट घेऊन, त्याप्रमाणे वाहिन्या दाखविल्या जाणार होते. मात्र, प्रत्यक्षात केबल चालक कुठल्याही ग्राहकांपर्यंत पोहोचलेले नसून, ग्राहकांनाच कार्यालयात बोलावून, त्यांच्यावर त्यांनी तयार केलेल्या पॅकेजचा मारा करीत आहेत. त्या पॅकेजमध्ये संबंधित ग्राहकांना हवे असलेले चॅनेल नसून, केवळ कंपनीहित आणि कमिशनचा विचार करून ग्राहकांना नको असलेल्या चॅनेलचा भडिमार करण्यात येत असल्याची ओरड होत आहे. 

१०० पेक्षा अधिक चॅनेलची जबरदस्ती 
१५३ रुपयांत मिळणाऱ्या १०० चॅनेल्समध्ये प्रसारभारतीची २४ सक्तीचे चॅनेल्स असणार आहेत. याशिवाय उर्वरित चॅनेल्समध्ये ग्राहक मोफत किंवा सशुल्क चॅनेल्सचा समावेश या १०० चॅनेल्समध्ये करू शकतो. मोफत चॅनेल्सचे पैसे ग्राहकाला द्यावे लागणार नाहीत. पण, सशुल्क चॅनेल्सबाबत मात्र केवळ त्याच चॅनेल्स/बुकेचे पैसे ग्राहकाला द्यावे लागतील. ग्राहकाला जर १०० पेक्षा अधिक चॅनेल्स हवे असतील तर त्याला अतिरिक्त क्षमता शुल्क  भरावी लागेल, ते दर २५ चॅनेल्सना २० रुपये इतके असते. केबल चालकांमार्फत या १०० फ्री चॅनेलमधे अन्य भाषिक चॅनेल अथवा लोकल केबल टीव्हीचे चॅनेल दिले जात असून, इतर प्रत्येक चॅनेलसाठी ८० पैसे तर, एचडी चॅनेलसाठी १ रुपया ८० पैसे सर्व्हिस टॅक्‍स लावला जात आहे. 

केबल ऑपरेटर्सतर्फे ग्राहकांना पॅकेजची सविस्तर माहिती मिळत नाही. ग्राहकांना दिलेल्या पॅकेजमध्ये अनावश्‍यक वाहिन्यांचा भडिमार केला जात असून, परस्पर इतर पॅकेज तसेच केबल चालकांच्या लोकल वाहिन्या ग्राहकांवर लादण्याचा प्रयत्न होत आहे. 
-अमित पाटील, ग्राहक.

ग्राहकांची दिशाभूल
१०० चॅनेलमधे केवळ २४ डीडीचे सक्तीचे चॅनेल सोडल्यास इतर ७६ चॅनेलमधे ग्राहकांच्या आवडीचे चॅनेल अलाकाटा पद्धतीने अथवा वाहिनीच्या पॅकेजनुसार दिल्यास, केवळ २५० ते ३०० रुपयांमधे ग्राहकांना आपल्या आवडीचे चॅनेल पाहता येतील. परंतु, तसे न करता प्रत्येक ग्राहकाचे १०० च्या वर चॅनेल नेऊन केवळ आपल्या कमिशनचा टक्का वाढावा, यासाठी केबल चालक आणि डीटीएच कंपनीधारक ग्राहकांची दिशाभूल करीत ४०० ते ५०० रुपयांपर्यंतचे पॅकेज ग्राहकांच्या माथी मारत आहेत.  

नवीन नियमावली लागू करण्यासाठी ट्रायने ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आम्ही सर्व एमएसओ आणि डीटीएच ऑपरेटर्स यांना ट्रायच्या दिशानिर्देशांचे पालन करण्यास, चॅनेल ब्लॅकआउट न करण्यास व ट्रायच्या आदेशानुसार सर्व चॅनेल जुन्या पॅकप्रमाणे सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे. 
-ॲड. हितेश मुथा, अध्यक्ष,  विदर्भ केबल ऑपरेटर्स संघटना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com