उपराजधानीच्या वेशीवरील वाघावर कॅमेरा ट्रॅपची नजर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

नागपूर : उपराजधानीच्या वेशीवरील वाघावर नजर ठेवण्यासाठी 24 तासांचे नियोजन करून गस्त केली जात आहे. मानव-वन्यजीव संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून गावागावात सूचना फ्लेक्‍स व वाघाच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅप लावले आहेत.

नागपूर : उपराजधानीच्या वेशीवरील वाघावर नजर ठेवण्यासाठी 24 तासांचे नियोजन करून गस्त केली जात आहे. मानव-वन्यजीव संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून गावागावात सूचना फ्लेक्‍स व वाघाच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅप लावले आहेत.
एक सप्टेंबरपासून नागपूर विभागातील सेमिनरी हिल्स वनपरिक्षेत्रातील फेटरी, बोरगाव, येरला व कळमेश्‍वर वनपरिक्षेत्रातील कारली, आलेसूर, साहुली, कलंबी या गावांच्या परिसरामध्ये वाघ फिरत आहे. त्यामुळे तांत्रिक मार्गदर्शन व पूर्ण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि प्रसंगी कारवाई करण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) यांच्याकडील मार्गदर्शक सूचनेनुसार समिती गठित केली आहे. या परिसरात वाघाचे वास्तव्य असल्याने पाळीव जनावरांची शिकार वगळता कोणताही अनुसूचित प्रकार अद्याप घडलेला नाही.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने वाघाचे अस्तित्व असलेल्या परिसरांमध्ये सूचना फलक लावले आहेत. कॅमेरा ट्रॅपच्या साह्याने 24 तास परिसरावर नजर ठेवली जात आहे. वाघ गावाच्या परिसरात फिरत असल्याने मानव-वन्यजीव संघर्ष होऊ शकतो. ही स्थिती निर्माण होऊ नये म्हणून मंगळवारी हरिसिंग सभागृह सेमिनरी हिल्स येथे समितीची सभा घेण्यात आली. सभेला उपवनसंरक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्‍ल, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते, मुख्य वन्यजीव रक्षक यांचे प्रतिनिधी म्हणून सृष्टी पर्यावरण मंडळाचे सचिव विनीत अरोरा, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध नंदागवळी, संजय देशपांडे, सरपंच रवींद्र ढोले (बोरगाव), उपसरपंच मारोती खडतकर (साहुली) उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Camera trap on the tiger above the gateway