शिष्यवृत्ती परीक्षेचा टक्का वाढविण्यासाठी प्राध्यापिकेची मोहीम

छायाचित्र
छायाचित्र

नागपूर : शिष्यवृत्ती परीक्षेत महानगरपालिकेचा निकाल तसा जेमतेमच लगतो. अनुत्तीर्ण होण्याच्या भीतीने परीक्षा देणाऱ्या मुलांचीही संख्या कमीच आहे. हा टक्का वाढावा आणि मुलांना शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण करण्याचा चंग एका प्राध्यापिकेने बांधला आहे. दररोज महापालिकेतील शाळांना भेटी देत, पाचवी ते आठवीच्या शिक्षकांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून त्या करीत आहेत.

दहावी आणि बारावी आणि त्यासमोरील स्पर्धा परीक्षेमध्ये "आब्जेक्‍टिव्ह' प्रश्‍नांचा समावेश असतो. पाचवी आणि आठवीतील शिष्यवृत्ती परीक्षेतही बऱ्याच "ऑब्जेक्‍टिव्ह' प्रश्‍नांचा समावेश असतो. त्यामुळे या परीक्षा त्यासाठी मार्गदर्शक ठरत असतात. पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पहिल्या पेपरमध्ये भाषा आणि गणित तर दुसऱ्या पेपरमध्ये तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी आणि त्या-त्या वर्गाच्या अभ्यासक्रमाचा समावेश असतो.


महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शिकविताना बरेचदा बुद्धिमत्ता चाचणीबाबत शिकविला जात नाही. शिवाय शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात मुळात स्पर्धा परीक्षेचा अनुभव असलेल्यांनाच ते अधिक जमते. ही बाब ओळखून राज्य विज्ञान संस्थेच्या प्रा. मनीषा भडंग यांनी महापालिकेच्या परवानगीने आपल्या कामाच्या वेळा सांभाळून महापालिका शाळेतील शिक्षकांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. त्यांच्या या उपक्रमाला अप्पर आयुक्त राम जोशी यांनी कौतुक करून पालिकेतील शाळांना त्यांना सहकार्य करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता अधिक जोमाने त्या महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांना मार्गदर्शन करण्याचे काम करीत आहेत.


स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांनी व्हावे सहभागी
महापालिकेत येणारे विद्यार्थी हे जवळपास गरिबी रेषेच्या खालचेच. शिष्यवृत्तीसारख्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी त्यांना शाळांमधील शिक्षकांवरच अवलंबून राहावे लागते. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने ही परीक्षा अतिशय महत्त्वाची असल्याने त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांनी या उपक्रमात सामाजिक दायित्व म्हणून सहभागी होण्याचे आवाहन प्रा. मनीषा भडंग (9767652588) यांनी केले आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com