कॅम्पस टू कार्पोरेट कोर्सबाबत अमरावती विद्यापीठाचा करार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

अमरावती - नांदगावपेठ पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत येऊ घातलेल्या उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ, याशिवाय महाराष्ट्र व देशपातळीवर लागणारे मनुष्यबळ विद्यापीठाच्या परीक्षेत्रात उपलब्ध व्हावे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, रोजगारक्षम विद्यार्थी तयार व्हावेत, यासाठी टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा प्रौढ व निरंतर शिक्षण आणि विस्तार सेवा विभागात सामंजस्य करार करण्यात आला. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

सामंजस्य करारासंदर्भात अधिक माहिती देताना कुलसचिव डॉ. देशमुख म्हणाले की, कॅम्पस टू कार्पोरेट ही महत्त्वाची संकल्पना घेऊन विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास साधून उद्योग जगताला लागणारी सक्षमता निर्माण व्हावी, या अनुषंगाने टाटा कन्सलटन्सीच्या माध्यमातून विद्यापीठ परीक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी पूरक अभ्यासक्रम तयार करण्यात आला. त्यामध्ये इंग्रजी संवाद कौशल्य, मुलाखतीची तयारी, हाताळण्याची क्षमता, व्यावसायिक सभ्यता व परिपूर्णता आदी बाबींची तयारी विद्यार्थ्यांकडून या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून करून घेतली जाणार आहे. रोजगारक्षम विद्यार्थी तयार होण्यासाठी 70 तासांचा अभ्यासक्रम निर्धारित करण्यात आला. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकांकरिता पाच दिवसांचा अल्पकालीन प्रशिक्षण वर्ग टाटा कन्सलटन्सीच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. यामध्ये शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येईल. त्यानंतर प्रशिक्षित शिक्षकांच्या माध्यमातून आवश्‍यक असलेले मनुष्यबळ निर्माण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केल्या जाईल. शिक्षकांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांना टाटा कन्सल्टन्सीतर्फे प्रमाणपत्र देण्यात येईल.

प्रशिक्षित असा शिक्षक वर्ग या माध्यमातून तयार होणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. टाटा कन्सलटन्सीकडून 70 दिवसांच्या अभ्यासक्रमासाठी कोणतेही शुल्क आकारल्या जाणार नसून विद्यार्थ्यांना विनामूल्य हा अभ्यासक्रम पूर्ण करता येणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

पत्रकार परिषदेला निरंतर प्रौढ शिक्षण संचालक डॉ. श्रीकांत पाटील, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. गणेश माल्टे, जनसंपर्क अधिकारी डॉ. नांदूरकर, टाटा कन्सलटन्सीचे राजा नरोरा, सरोज पंडा, मृदाल चौधरी उपस्थित होते.

Web Title: campus to corporate amravati university agreement