सुरक्षा नसलेल्या आश्रमशाळांची मान्यता रद्द करा - विजया रहाटकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

खामगाव - विद्यार्थिनींच्या सुरक्षा आणि सुविधेची व्यवस्था नसलेल्या सर्व शाळांची मान्यता रद्द करावी, सोबतच पाळा येथील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या अन्य आश्रमशाळांत त्वरित समायोजन करण्याव यावे, अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केली. त्यांनी आज पाळा येथील स्व. निंबाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळेची पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

खामगाव - विद्यार्थिनींच्या सुरक्षा आणि सुविधेची व्यवस्था नसलेल्या सर्व शाळांची मान्यता रद्द करावी, सोबतच पाळा येथील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या अन्य आश्रमशाळांत त्वरित समायोजन करण्याव यावे, अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केली. त्यांनी आज पाळा येथील स्व. निंबाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळेची पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
या पत्रकार परिषदेस भाजपच्या नेत्या श्‍वेता महाले, आमदार आकाश फुंडकर यांची उपस्थिती होती. विजया रहाटकर म्हणाल्या, की आश्रमशाळेची पाहणी करून या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली. या आश्रमशाळेत सुरक्षा तसेच अन्य कोणत्याच सुविधा नाहीत. आदिवासी विकासमंत्र्यांनी या शाळेची मान्यता रद्द केली आहे. आता तेथील विद्यार्थी-विद्यार्थिनींना अन्य शाळांत प्रवेश देण्यात यावा, तसेच राज्यातील सर्वच आदिवासी आश्रमशाळांची तपासणी करण्यात येऊन, ज्या शाळांमधे सुरक्षा व अन्य सुविधा नाहीत, अशा सर्व शाळांची मान्यता रद्द करावी, अशी आमची मागणी आहे. पाळा येथील आश्रमशाळेत लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या माध्यमातून राज्यातील सर्वच आश्रमशाळांमधील प्रश्‍न ऐरणीवर आले असून, महिला आयोग याबाबत गंभीर पावले उचलणार आहे. पाळा येथील पीडित मुलीला मनोधैर्य योजनेतून दोन लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित अशा सर्व आश्रमशाळा शर्ती व अटींचे पालन करीत नाहीत, अशा शाळांच्या सुविधा व मुलींच्या सुरक्षिततेचा अहवाल शासनाला सखोल अभ्यास करून सादर केला जाणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

आता 15 आरोपी
पाळा आदिवासी निवासी आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनींवरील अत्याचार प्रकरणात आत्तापर्यंत अटकेतील आरोपींची संख्या 15 वर पोचली आहे. पीडित मुलींची संख्या सहा सांगितली जात असली, तरी या मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली नाही. त्यांचे जबाब नोंदविण्यात आले असल्याचे कळते. पोलिसांनी शुक्रवारपर्यंत 11 आरोपींना अटक करून त्यांची दहा नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळवली आहे. यामध्ये संस्थाध्यक्ष गजानन निंबाजी कोकरे, शिपाई इत्तुसिंग काळूसिंग पवार, मुख्याध्यापक (प्राथमिक) भरत विश्‍वासराव लाहुडकार, मुख्याध्यापक (माध्यमिक) डिगांबर राजाराम खरात, लॅब टेक्‍निशियन स्वप्नील बाबूराव लाखे, वसतिगृह अधीक्षक नारायण दत्तात्रय अंभोरे, स्वयंपाकी दीपक अण्णा कोकरे, कारकून विजय रामुजी कोकरे, स्त्री अधीक्षक ललिता जगन्नाथ वजीरे, स्वयंपाकी मंठाबाई अण्णा कोकरे, स्वयंपाकी शेवंताबाई अर्जुन राऊत या आरोपींचा समावेश आहे. आज आरोपींची संख्या वाढून आता 15 झाली आहे. यातील बाळकृष्ण घुटाजी वाघे (वय 65), साहेबराव रामा कोकरे (वय 42), अनिल राघोजी कोकरे (वय 36, सर्व रा. गणेशपूर) आणि मोहन राजाराम कोकरे (वय 45, रा. खामगाव) या चौघांना पोलिसांनी काल रात्री अटक केली.

कठोर कारवाईची मागणी
पाळा येथील आश्रमशाळेतील लैंगिक शोषणाचा प्रकार अत्यंत घृणास्पद असून, माणुसकीला काळिमा फासणारा आहे. या घटनेचा प्रदेश महिला कॉंग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. हा प्रकार समस्त स्त्रीवर्गाचा अपमान करणारा आहे. त्यामुळे संबंधित संस्थेची आणि आरोपींची सखोल चौकशी होऊन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व पीडित विद्यार्थिनीला न्याय देण्यात यावा, अशी मागणी प्रदेश महिला कॉंग्रेसच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शिष्टमंडळाने खामगाव येथील अतिरिक्त पोलिस अधीक्षक यांना या मागणीचे निवेदन दिले.

Web Title: Cancel ashram schools are not recognized security