गुरुवारचा "ड्राय डे' हायकोर्टात रद्द 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

नागपूर - महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर 21 आणि 23 फेब्रुवारीला जिल्हाधिकाऱ्यांनी घातलेली दारूबंदी शिथिल करीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी (ता. 23) केवळ निकालापर्यंत दारूबंदी लागू राहील, असे स्पष्ट केले. 

नागपूर - महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर 21 आणि 23 फेब्रुवारीला जिल्हाधिकाऱ्यांनी घातलेली दारूबंदी शिथिल करीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी (ता. 23) केवळ निकालापर्यंत दारूबंदी लागू राहील, असे स्पष्ट केले. 

जिल्हाधिकाऱ्यांनी 15 फेब्रुवारी 2017 रोजी 21 आणि 23 फेब्रुवारी रोजी "ड्राय डे' घोषित केला होता. यामुळे मतदान (21 फेब्रुवारी) आणि मतमोजणीच्या (23 फेब्रुवारी) दिवशी बार, रेस्टॉरेंट, क्‍लब आदी ठिकाणी मद्यविक्री करण्यास बंदी घालण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशामुळे 21 आणि 23 असे दोन दिवस व्यवसाय ठप्प राहील. यात मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल, असा मुद्दा याचिकाकर्ता महाराष्ट्र वाईन मर्चंट्‌स असोसिएशनने न्यायालयात मांडला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांचे परिपत्रक व्यवसाय करण्याच्या घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारावर गदा असल्याचा असोसिएशनचा दावा आहे. 

संपूर्ण दिवसभर दारूविक्रीवर बंदी लादणे अन्यायकारक आणि अतिशयोक्तीपूर्ण असल्याचे याचिकाकर्त्याने सांगितले. "ड्राय डे'बाबत वेगवेगळ्या शहरातील जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या परिपत्रकात एकवाक्‍यता नसल्याचा मुद्दाही याचिकेमध्ये आहे. अमरावती, नागपूर तसेच इतर जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या परिपत्रकामध्ये "ड्राय डे' कधी आणि किती वाजेपर्यंत असावा यामध्ये तफावत आहे. असोसिएशनने मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी सायंकाळनंतर दारूविक्रीची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती याचिकाकर्त्याने केली. मात्र, प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेत न्यायालयाने केवळ मतमोजणीनंतर दारूविक्री करता येईल, असे अंतरिम आदेशात म्हटले. तसेच मतदानाच्या दिवशी "ड्राय डे' नसावा या विनंतीवरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला. यावर उत्तर सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना चार आठवड्यांची मुदत दिली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ऍड. श्‍याम देवानी, ऍड. कैलाश डोडानी आणि ऍड. साहील देवानी यांनी बाजू मांडली. 

Web Title: canceled Dry Day