मी वचन देतो की, निवडणुकीत दारूचा वापर करणार नाही

File photo
File photo

गडचिरोली : जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी विधानसभा मतदारसंघातील नऊ प्रमुख उमेदवारांनी दारूमुक्त निवडणुकीच्या आवाहनाला प्रतिसाद देत निवडणुकीदरम्यान मतदारांना प्रभावित करण्यासाठी कोणत्याही प्रकारे दारूचा वापर करणार नाही व दारूबंदीला समर्थन देतो, असे जाहीर लेखी वचन जनतेला दिले आहे.
जिल्ह्यातील 600 गावांनी दारूबंदी लागू केली आहे. 120 ग्रामपंचायतींच्या 287 गावांनी ग्रामसभेत दारूमुक्त निवडणूक करण्याचा ठराव पारित केला. "उमेदवारांना निवडणूक प्रचारादरम्यान दारूचा वापर करू देणार नाही, दारू स्वीकार करणार नाही व तसेच शुद्धीत राहूनच मतदान करणार', असे ग्रामसभेचे ठराव गावांनी पारित केले. जिल्ह्यातील 1500 गावांत दारूमुक्त निवडणूक अभियानाचा प्रचार करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात महिला, युवा व पुरुष मतदारांनी रॅली व सभांमध्ये सहभाग घेतला. या सोबतच उमेदवारांनी दारूमुक्त निवडणुकीसाठी व दारूबंदीला समर्थन करण्याचे वचन लिहून देण्याचे आवाहन मुक्तिपथ अभियानाचे संस्थापक डॉ. अभय बंग यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आरमोरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कृष्णा गजबे, गडचिरोली मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. देवराव होळी, कॉंग्रेसच्या डॉ. चंदा कोडवते, वंचित बहुजन आघाडीचे गोपाल मगरे, शेकापच्या जयश्री वेळदा आणि अपक्ष उमेदवार सागर कुंभरे तर अहेरी विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार दीपक आत्राम, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धर्मरावबाबा आत्राम, वंचित बहुजन आघाडीचे ऍड. लालसू नोगोटी यांनी संकल्प लिहून दिला.

दिलेले वचन
"निरोगी लोकशाहीसाठी निवडणूक दारूमुक्त होणे आवश्‍यक आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जनतेला जाहीर वचन देतो की, विधानसभा निवडणुकीत मी व माझा पक्ष मते मिळविण्यासाठी दारूचा वापर करणार नाही. मी गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीचे समर्थन करतो. या निवडणुकीत निवडून आल्यास अथवा न आल्यास जिल्ह्यातील दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मी पूर्णपणे प्रयत्न करीन, असे वचन देतो' असे पत्रात नमूद आहे. विशेष म्हणजे, लिखित वचनासोबत उमेदवारांनी व्हिडिओवरदेखील वचन दिले आहे.

""गडचिरोली जिल्ह्यात 25 वर्षांपासून दारूबंदी आहे. ती अबाधित राहावी, यासाठी आम्ही मुक्तिपथ अभियानामार्फत सातत्याने प्रयत्न करीत आहोत. पण निवडणूक काळात मतदात्याला आपल्या बुद्धीचा वापर करू न देता दारू पाजून मत विकत घेण्याचा विकृत प्रकार चालतो. यात मतदारांचे आणि पर्यायाने लोकशाहीचे नुकसान होत आहे. त्यामुळे निवडणूक दारूमुक्त करण्याचे आवाहन हे केवळ उमेदवारांनाच नाही तर मतदारांना आहे. त्यामुळेच हे संकल्प उमेदवारांकडून लेखी घेतले आहेत.
- डॉ. अभय बंग
संस्थापक, मुक्तिपथ अभियान, गडचिरोली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com