भाजप-सेनेत बंडाचे निशाण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

नागपूर : भाजपची पहिली यादी जाहीर होताच विदर्भात इच्छुकांसह शिवसेनेमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेकांनी यादीवर आक्षेप घेत बंडखोरीची भाषा सुरू केली आहे. विशेषतः पहिल्या यादीत सुधाकर कोहळे व राजू तोडसाम या दोन विद्यमान आमदारांची तिकिटे कापली आहेत. त्यांनी बंडखोरीचे संकेत दिले आहे, तर गोंदियात विनोद अग्रवाल वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत आहे.

नागपूर : भाजपची पहिली यादी जाहीर होताच विदर्भात इच्छुकांसह शिवसेनेमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेकांनी यादीवर आक्षेप घेत बंडखोरीची भाषा सुरू केली आहे. विशेषतः पहिल्या यादीत सुधाकर कोहळे व राजू तोडसाम या दोन विद्यमान आमदारांची तिकिटे कापली आहेत. त्यांनी बंडखोरीचे संकेत दिले आहे, तर गोंदियात विनोद अग्रवाल वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत आहे.
दक्षिण नागपूरमध्ये विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांच्याऐवजी माजी आमदार मोहन मते यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे नाराज झालेले कोहळे यांनी बंडखोरीचे संकेत दिले आहे. उद्या बुधवारी कार्यकर्त्यांची भेटून आपण निर्णय जाहीर करू असा इशाराही त्यांनी दिला आहे. युतीमध्ये दक्षिण नागपूर शिवसेनेकडे होता. मात्र, भाजपने उमेदवार जाहीर केल्याने शिवसैनिकसुद्धा नाराज आहेत. मात्र, त्यांनी अद्याप आपले इरादे जाहीर केलेले नाही. याच मतदारसंघातून कॉंग्रेस प्रमोद मानमोडे यांनी उमेदवारी मागितली आहे. त्यांनी प्रचाराचा धडाकाही लावला आहे. उमेदवारी दिली नाही तरी आपण लढणारच असा इशाराही त्यांनी दिला आहे. मध्य नागपुरातील कॉंग्रेसने अद्याप उमेदवारी जाहीर केली नसली तरी अनेक कार्यकर्त्यांनी तलवारी पाजळून ठेवल्या आहेत. उत्तर नागपुरामध्ये कॉंग्रेसने माजी मंत्री व पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन राऊत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. येथील चार नगरसेवक, तीन ब्लॉक अध्यक्ष तसेच इतरा पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचे पत्र प्रदेशाध्यक्षांकडे पाठविले आहे.
रामटेक विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून आशीष जयस्वाल तीनवेळा निवडून आले होते. मात्र, सध्या येथे भाजपचे आमदार आहे. ही जागा सोडण्यास भाजपने नकार दिल्याने जयस्वाल यांनी अपक्ष लढण्याचा इशारा दिला आहे. कॉंग्रेसकडून येथे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी भूमिपुत्र आघाडी स्थापन केली आहे. मुळक यांना उमेदवारी दिल्यास बंडखोरी होण्याची दाट शक्‍यता आहे.
तिकीट नाकारलेले आर्णी (यवतमाळ) मतदारसंघातील विद्यमान आमदार राजू तोडसाम यांनीही कार्यकर्त्यांच्या बैठकी सुरू केल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी मतदारसंघ शिवसेनेला दिल्यामुळे नाराज भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयालाच कुलूप ठोकले. तसेच गोंदियातील कॉंग्रेस आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपात प्रवेश केल्याने त्यांना तिकीट मिळण्याची शक्‍यता वाढली आहे. ते पाहता तिकिटाच्या स्पर्धेतील विनोद अग्रवाल यांनी अपक्ष लढण्याची तयारी सुरू केली आहे.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: candidates from bjp, shivsena may contest against