हा उमेदवार की हस्ताक्षराचा जादुगार? मतदारांना पाडली भुरळ

राजकुमार भीतकर
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

एक उमेदवार आपल्या अक्षरांच्या जादूने सर्वांना मोहीत करीत होता. लोकशाहीची मूलतत्वे, मतदानाचा अधिकार आणि नागरिकांचे हक्क यांची सांगड घालून लोकांना नागरिकशास्त्राचे धडे देत होता. तो राज्यशास्त्राचा अभ्यासकच नाही; तर पदव्युत्तर पदवीधर आहे. त्यांचे राज्यशास्त्रात एम.ए., एम.फिल. व नेट झाले आहे. बी.एड.ही शिक्षणशास्त्रातील पदवीदेखील नागरिकशास्त्रात मिळविली आहे.

यवतमाळ : असं म्हणतात, "कलागुण उपजतच असतात'. आवाज कितीही गोड असला तरी सूर जुळण्याची शक्‍यता नसते. म्हणून रियाज करावाच लागतो. मात्र, त्यासाठी आवाज ही निसर्गदत्त देण असावीच लागते. सुंदर अक्षरे ही देखील एक देणच आहे. अक्षरांवरून मानसाचा स्वभाव व चारित्र्य कळते, असे म्हणतात. सुंदर अक्षरेसुद्धा मोहिनी घालू शकतात याचा प्रत्यय यावेळी उमरखेड विधानसभा मतदारसंघातील मतदारांना आला. अक्षरांची जादूच या मतदारसंघातील एका उमेदवारांनी केल्याने हे इपरित घडले.

उमरखेड विधानसभा मतदारसंघातून यावेळी दहा उमेदवार उभे होते. त्यापैकी काही अनुभवी राजकारणी, तर काही नवखे होते. कुणी डॉक्‍टर तर कुणी प्राध्यापक होते. प्रत्येकाची आपली वेगळी अशी ओळख असलेले उमेदवार रिंगणात होते. लोकशाहीच्या या महामेळ्यात प्रत्येकाने आपले वेगळेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्यात एक उमेदवार आपल्या अक्षरांच्या जादूने सर्वांना मोहीत करीत होता. लोकशाहीची मूलतत्वे, मतदानाचा अधिकार आणि नागरिकांचे हक्क यांची सांगड घालून लोकांना नागरिकशास्त्राचे धडे देत होता. तो राज्यशास्त्राचा अभ्यासकच नाही; तर पदव्युत्तर पदवीधर आहे. त्यांचे राज्यशास्त्रात एम.ए., एम.फिल. व नेट झाले आहे. बी.एड.ही शिक्षणशास्त्रातील पदवीदेखील नागरिकशास्त्रात मिळविली आहे. राज्यशास्त्राचा अभ्यासक असल्यामुळे विधिमंडळ व संसदेशिवाय नागरिकांचे प्रश्‍न सोडविता येत नाही. महागाव तालुक्‍यात पहिली शेतकरी आत्महत्या झाली, तिची धग जगभर पोहोचली. परंतु, ती संसदेपर्यंत पोहोचू शकली नाही, याचे शल्य असल्याचे संदेश सांगतो. लोकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी व लोकशाही बळकट करण्यासाठी राजकारणात सुशिक्षितांनी येणे गरजेचे आहे. नागरिकांनी मतदान का करावे, नागरिकांचे हक्क व मूलभूत अधिकार याबाबत त्यांनी सोशल मीडियावरून लोकशिक्षण दिले. दररोज आपले म्हणणे स्व:हस्ताक्षरात लिहून ते व्हायरल केले. संदेशच्या सुंदर हस्ताक्षरातील संदेश लोकांना भुरळ घालत होते.

त्यांनी आपल्या सुबक अक्षरे व सुबोध संदेशांची मोहिनी मतदारांना घातली. त्यात ते यशस्वीही झाले. परंतु, मतदारांचे व त्यांचे सूर जुळले की नाही हे मात्र येत्या 24 तारखेलाच कळणार आहे.

उमरखेड मतदारसंघात विविध प्रश्‍न आहेत. शेतकरी, युवकांचे प्रश्‍न आहेत. विधवा, परित्यक्तांच्या समस्या आहेत. शेतकरी आत्महत्येचा प्रश्‍न आहे. या सर्व समस्या सोडविण्यासाठी एक सुशिक्षित चेहऱ्याचा पर्याय देण्याचा मी निवडणुकीतून प्रयत्न केला आहे.
- संदेश रणवीर
उमेदवार, उमरखेड विधानसभा मतदारसंघ.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: candidate's handwriting influence voters of umarkhed