खिचडी निकृष्ट; विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ

File photo
File photo

दर्यापूर (अमरावती) : शहरातील रत्नाबाई राठी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या खिचडीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी किडा व किटुकले आदी निदर्शनास आले आहे. तसेच खिचडी निकृष्ट प्रतीची असल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकारामुळे शालेय पोषण आहार योजनेचा कारभार चव्हाट्यावर आला असून हजारो विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

शासनाच्या वतीने शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत वर्ग 1 ते 8 मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना माध्यान भोजन म्हणून शालेय पोषण आहार देण्यात येतो. यामध्ये तांदूळ, तूरडाळ, मटकी, वाटाणा, बिस्कीट, चिक्की, राजगुरा लाडू, केळी आदी आहार आठवड्यांतील विविध दिवशी अनुक्रमे विद्यार्थ्यांना पुरवण्यात येतो. शहरातील रत्नाबाई राठी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांच्या प्लेटसमध्ये सोमवार 16 ते बुधवार 18 अशा सलग तीन दिवस सोंडे, अळ्या, स्टॅपलर पीन, नाकतोडा आदी दिसल्याचे विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान या गंभीर प्रकाराने विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये चांगलीच तारांबळ उडाली असून पोषण आहारातील खिचडी खाण्यातून अपवादाने काही बाधा झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
दरम्यान, शालेय पोषण आहारातील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या खिचडी वाटप करण्याच्या निविदेत अनेक बाबतीत अनियमितता आहे. असा आक्षेप घेत दर्यापूर नगरपालिकेतील सत्ताधारी नगरसेवकांनी शहरातील जवळपास 6 हजार विद्यार्थ्यांना शाळेत मध्यान्ह भोजन पुरवण्याचा हा कंत्राटच रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

शाळांकडून अहवाल मागविण्यात आला आहे. चालू शैक्षणिक सत्रात पोषण आहार सुरू झाल्यापासून कुठल्याच प्रकारची लेखी तक्रार पालिका कार्यालयाला प्राप्त झालेली नाही. विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात काही आढळण्याच्या लेखी तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितांवर रीतसर कारवाई करण्यात येईल.
-गीता वंजारी, मुख्याधिकारी, नगरपरिषद, दर्यापूर.

गेल्या दोन-तीन दिवसांत विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात विविध मृत किडे आढळले. यासंबंधात वरिष्ठांना फोनवरून कळविण्यात आले आहे. आता याबाबत लेखी तक्रार करण्यात येणार आहे.
-दीपक हिरूळकर, मुख्याध्यापक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com