काळजी, प्रेम, विश्‍वासाने गुंफले आपुलकीचे नाते 

मनीष मोहोड
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

नागपूर : काळजी, प्रेम आणि विश्‍वासामुळे मदर इन लॉ म्हणजेच कायद्याची आई "सासूबाई' यांच्यासोबत नाते अतिशय आपुलकीने विनल्या गेल्याचे माधवी राजेश दंढारे यांनी "सासरच्या आई' या सदरातील मनोगतात सांगितले. पंचवटी, काटोल येथील कुसुम आणि माधवी दंढारे या सासू-सूनेने नात्याबद्दल माहिती दिली. 

नागपूर : काळजी, प्रेम आणि विश्‍वासामुळे मदर इन लॉ म्हणजेच कायद्याची आई "सासूबाई' यांच्यासोबत नाते अतिशय आपुलकीने विनल्या गेल्याचे माधवी राजेश दंढारे यांनी "सासरच्या आई' या सदरातील मनोगतात सांगितले. पंचवटी, काटोल येथील कुसुम आणि माधवी दंढारे या सासू-सूनेने नात्याबद्दल माहिती दिली. 
माधवी यांच्या लग्नाला सात वर्षे पूर्ण झाली असली तरी सासू-सूनेच्या नात्यातील उत्साह अद्याप कायम असल्याचे त्या सांगतात. माधवीच्या मैत्रिणीची मोठी आई असल्याने त्या सासूबाईला आधीपासून ओळखत होत्या. उच्चशिक्षित सून मिळावी असे सासूबाईंना वाटत असल्याने त्यांनी नात्यातील मुलगी मुलासाठी मागितली. माधवी लग्नानंतर शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. परंतु, आरोग्याच्या तक्रारी आणि लहान बाळ असल्याने त्यांनी नोकरी सोडून घराकडे लक्ष केंद्रीत केले. 
लग्नानंतर आरोग्याच्या समस्यांमुळे वारंवार रुग्णालयात जावे लागत होते. त्यानंतर गोंडस मुलीने दंढारे कुटुंबात प्रवेश केला. कुटुंब आनंदात असतानाच लहान बाळाला हृदयात समस्या असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. अवघ्या सात महिन्यांच्या चिमुकलीची हृदयाची शस्त्रक्रिया करावी लागली. या काळात माधवी मनाने कमकुवत झाल्या होत्या. सासूबाई कुसुम यांनी माधवी यांना भक्कम आधार दिला. बाळाची व सुनेची जबाबदारी त्यांनी घेतली. यामुळे माधवी यांचे सासूसोबतचे नाते अधिकच घट्ट झाले. नोकरी असो वा कुटुंबातील कुठलीही जबाबदारी आई नेहमीच मायेने समजावून सांगतात. काहीवेळा मतभेद झाले तरीही रागावत नाहीत व अबोलाही ठेवत नाही. त्यामुळेच त्यांना कधी दुखावत नसल्याचे माधवी यांनी सांगितले. 

सात वर्षांत आईंनी कधीही दुखावले नाही. नेहमी मनमोकळे बोलणे आणि हसणे हा त्यांचा मूळ स्वभाव असल्याने माझ्या मैत्रिणींनाही त्या आवडतात. पतीनंतर सर्वांत जवळचे नाते हे सासूसोबतच असल्याने ते आनंदीच असले पाहिीजे. 
- माधवी राजेश दंढारे, सून. 

सासू-सुनेचे नाते प्रेम, आपुलकी आणि विश्‍वासावर कायम असते. सासूनेच सूनेला सांभाळून घेतले तर घरातील गोष्ट बाहेर जात नाही आणि वाद वाढत नाही. प्रेम दिले तर बदल्यात प्रेमच मिळणार ही मानसिकता स्त्रियांनी स्वीकारली तर अडचण येत नाही. 
- कुसुम ज्ञानेश्‍वर दंढारे, सासू. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Care, love, faith, relationships