युवतीपुढे प्रस्ताव ठेवणे युवकाला पडले महागात; विनयभंग, ठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा

संतोष ताकपिरे
Monday, 23 November 2020

काही दिवसांपूर्वीच त्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. युवतीने त्यासाठी स्पष्ट नकार दिला. युवती आपल्याला टाळत असल्याचे लक्षात येताच गजाननने तिला व कुटुंबीयांना शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली.

अमरावती : ते दोघे काही दिवसांपासून एकमेकांच्या प्रेमात पडले होते. परंतु, काही दिवसांपूर्वी तिने प्रियकरापासून वेगळे राहणे पसंत केले. तरीही त्याने तिच्यापुढे एकांतात भेटण्याचा प्रस्ताव ठेवला. परंतु, हा प्रस्ताव त्याला गजाआड करण्यास कारणीभूत ठरला.

शहरातील एक युवती काही वर्षांपूर्वी संशयित आरोपी गजानन धुळे (वय ३२, रा. वडाळी) या युवकाच्या प्रेमात पडली. त्यांच्या गाठीभेटी झाल्या. परंतु, अचानक गजाननच्या वागण्यात तिला बदल दिसू लागला. तो व्यसनाच्या आहारी गेल्याचा आरोप करीत प्रेयसीने त्याच्यासोबत बोलणे टाळले, एवढेच नव्हे तर संपर्कच बंद केला. युवती टाळत असतानाही गजानन सतत तिच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून एकांतात भेटण्याचा आग्रह करीत होता.

सविस्तर वाचा - दुर्दैवी! शेतात कामासाठी गेला शेतकरी; सापाने तब्बल तीन वेळा दंश केल्याने गेला जीव

काही दिवसांपूर्वीच त्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. युवतीने त्यासाठी स्पष्ट नकार दिला. युवती आपल्याला टाळत असल्याचे लक्षात येताच गजाननने तिला व कुटुंबीयांना शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. पीडितेच्या तक्रारीवरून अखेर संशयित आरोपी गजानन धुळेविरुद्ध विनयभंग, ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

महिलेच्या छेडखानीची दुसरी घटना शहरातील फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत घडली. एक युवती मैत्रिणीसह दुचाकीने अमरावतीवरून धामणगावरेल्वेकडे जात असताना संशयित आरोपी विजय हाडे (वय २१) याने तिचा पाठलाग केला. तो तिच्या मागेच थेट धामणगावरेल्वेपर्यंत पोहोचला. विजयने युवतीसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. पीडित युवतीने फ्रेजरपुरा पोलिसांत तक्रार केली असता पोलिसांनी संशयित विजय हाडेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

जाणून घ्या - वाघाचा मागोवा घेण्यासाठी वनविभागाचे पथक जंगलात घालत होते गस्त; समोरचे दृष्य पाहताच बसला धक्का

विजयच्या अटकेचे प्रयत्न सुरू
अनेक दिवसांपासून संशयित आरोपी युवतीचा पाठलाग करीत होता, असा आरोप तक्रारीत केल्या गेला. त्या तक्रारीची दखल घेऊन हा गुन्हा दाखल करून संशयित विजयच्या अटकेचे प्रयत्न सुरू आहेत.
- पुंडलिक मेश्राम,
पोलिस निरीक्षक, फ्रेजरपुरा ठाणे

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A case of threatening to kill a youth has been registered in Amravati