पतसंस्थेच्या व्यवस्थापकासह रोखपालास अटक

bank
bank

चिखली (जि.बुलडाणा): शहरातील गत तीन वर्षांपासून डबघाईस आलेल्या महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये झालेल्या सुमारे दीड कोटी रूपयांच्या अपहार प्रकरणी 12 जुलै रोजी पतसंस्थेच्या अध्यक्ष व कर्मचाऱ्यांवर विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये गत 2016 पासून आर्थिक व्यवहार मंदावले होते व अपहार झाल्याची माहिती सर्वत्र पसरली होती. याप्रकरणी संस्थेच्या त्रस्त झालेल्या ठेवीदारांनी ता.10 जुलै रोजी सहाय्यक निबंधकासह चिखली पोलिसांकडे तक्रारवजा निवेदन दिले होते. याप्रकरणी जिल्हा निबंधक सहकारी संस्था, बुलडाणा यांनी दिलीप मधुकर बागडे, लेखापरीक्षक यांना या प्रकरणी लेखापरिक्षण करण्यासाठी आदेशीत केले होते.

ता.12 जुलै रोजी दाखल करण्यात आलेल्या अप.क्र.412/2019 भांदवि कलम 420, 409, 406, 470, 471, 477 (अ), 34 भांदवि सहकलम 3, महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे संरक्षण) अधि. 1999 नुसार दाखल गुन्ह्यातील  महात्मा फुले नागरी सह. पतसंस्था मर्या., चिखली रजि.नं.435 या संस्थेत अपहार केलेली आरोपी 1) अध्यक्ष दत्तात्रय गणपत खरात रा.राऊतवाडी, चिखली व अधिकारी/कर्मचारी 2) सतीश प्रल्हाद वाघ, व्यवस्थापक 3) परमेश्वर सुखदेव पवार, रोखपाल 4) गणेश कचरूजी खंडागळे, व्यवस्थापक, शाखा राऊतवाडी चिखली यांनी खोटे व बनावट कॅश कर्जप्रकरणे तयार करून स्वत:च्या फायद्याकरिता संस्थेच्या ठेवीदारांचे पैशामधून 1,47,20,329/- रूपये उचल करून अपहार केलेला असल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

चार आरोपी, मोठा अपहार 
या गुन्ह्याचा आर्थिक गुन्हे शाखा, बुलडाणाकडे तपास हस्तांतरित झाल्यावर आजपर्यंत करण्यात आलेल्या तपासाअंती आरोपींनी या गुन्ह्यामध्ये एकूण 4,34,58,088/- रूपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील चारही आरोपी फरार होते. ता. 17 रोजी आर्थिक गुन्हे शाखा, बुलडाणा चे पोलीस उपअधीक्षक डी.बी.तडवी यांना मिळालेल्या माहितीवरून आरोपी 1) सतीश प्रल्हाद वाघ, व्यवस्थापक 2) परमेश्वर सुखदेव पवार, रोखपाल, महात्मा फुले सह.मर्यादित संस्था, चिखली त्यांच्या राहत्या घरी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे यातील दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांची कारवाई
बुलडाणा जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक दिलीप पाटील-भुजबळ यांचे मार्गदर्शनखाली अप्पर पोलीस अधिक्षक संदीप पखाले यांचे नेतृत्वात आर्थिक गुन्हे शाखेचे डीवायएसपी डी.बी.तडवी, पीएसआय दिगंबर अंभोरे, सरदार बेग, रामु मुंढे, निशांत चव्हाण, किरण भुजबळ, सिमा भुतेकर व चालक पो.कॉ. सचिन गायगोळ या पथकाद्वारे कार्यवाही करण्यात आलेली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com