कोरोनामुळे हाताला काम नाही; विवाह संघर्ष समिती, कॅटरर्स, डीजेवाल्यांनी केली आर्थिक मदतीची मागणी

file photo
file photo

गोंदिया : साउंड सिस्टम, मंडप डेकोरेशन, धुमाल, कॅटरिंग, डीजे, फुलवारी, आचारी, मजुरांचा व्यवसाय गेल्या आठ महिन्यांपासून हिरावला गेला आहे. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर रूप धारण करीत असून, शासनाने आतातरी जागे होऊन आर्थिक मदत करावी, अशी मागणी जिल्हा विवाह संघर्ष समितीने करीत सोमवारी (ता. २) निदर्शने केली.

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात मार्च महिन्यापासून लॉकडाउन करण्यात आले. त्यानंतर आता अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. बहुतांश व्यवहार सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. मात्र, कित्येक व्यवसाय आजही बंदच आहेत. त्यामुळे या व्यवसायाशी निगडित साउंड सिस्टम, मंडप डेकोरेशन, धुमाल, कॅटरिंग, डीजे, फुलवारी, आचारी, मिनी ट्रॉन्सपोर्ट चालक-मालक, मजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

राज्य सरकारने आर्थिक मदत करावी

गेल्या आठ महिन्यांपासून रोजगार नाही. त्यामुळे अर्धपोटी उपाशी राहण्याची वेळही त्यांच्यावर आली आहे. मध्यंतरी जिल्हा प्रशासनाला निवेदनातून समस्या, अडचणींची जाणीव करून देण्यात आली होती. परंतु, अद्याप यावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे राज्य सरकारने रोजगार उपलब्ध करून द्यावा किंवा आर्थिक मदत करावी, या मागणीसाठी जिल्हा विवाह संघर्ष समितीने सर्कस ग्राउंड येथे निदर्शने केली.

व्यावसायिकांचे आंदोलन

दरम्यान, आंदोलकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करीत असताना पोलिसांनी आंदोलकांना वाटेतच अडविले. आंदोलनात शेकडो पीडित मजूर, व्यावसायिक सहभागी झाले होते.

या आहेत मागण्या…

लग्न समारंभात 500 लोकांना परवानगी देण्यात यावी, डीजे, घोडा, बग्गी, लाइट, बॅंडची परवानगी देण्यात यावी, पुढील वर्षभराकरिता बॅंकांनी व्याज घेऊ नये, लॉकडाउनपासून आजपर्यंतचे वीजबिल माफ करण्यात यावे, 2019-20 चे नियमित आयकर भरणाऱ्या व्यावसायिकांना आयकरात सूट देण्यात यावी, जीएसटी 100 टक्के माफ करण्यात यावी आदी मागण्या आंदोलकांच्या आहेत.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com