ताडोबाच्या जंगलात वाघिणीची शिकार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 एप्रिल 2019

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील ताडोबा वनपरिक्षेत्रातील कोअर झोनमध्ये वाघिणीच्या झालेल्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. ज्या तारांमुळे वाघीण दगावली; त्या तारा कोणी लावल्या, याचा कसून तपास करावा. चौकशीअंती दोषींवर कडक कारवाई करावी, असे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले. 

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील कोअर झोनमध्ये एक वाघीण मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेच्या चौकशीचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील कोअर झोनमधील खातोडा गेटपासून काही अंतरावर असलेल्या एका आंब्याच्या झाडाखाली या वाघिणीचा मृतदेह आढळून आला. 

ज्या भागात वाघीण मृतावस्थेत आढळून आली, तो कोअर झोनमधील कक्ष क्रमांक 123 आहे. दोन दिवसांपूर्वीच वाघिणीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे शिकारीसाठी लावण्यात आलेल्या तारेच्या सापळ्यात वाघीण अडकली. त्यात तिचा मृत्यू झाला. कोअर झोन हे सर्वांत सुरक्षित मानले जाते. येथे जंगल आणि वन्यजीवांची सर्वाधिक घनता आहे. अशा ठिकाणी शिकारीसाठी फासे लावण्यात आले. यातून वनविभागाच्या सुरक्षायंत्रणेचा हलगर्जीपणा समोर आला. मृत वाघिणीचे वय अंदाजे दीड ते दोन वर्षे आहे. क्षेत्रसंचालक प्रवीण एन. आर. यांच्यासह कोअर विभागाचे उपसंचालक ना. सी. लडकत यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली. 
चौकशीचे वनमंत्र्यांचे आदेश 

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील ताडोबा वनपरिक्षेत्रातील कोअर झोनमध्ये वाघिणीच्या झालेल्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. ज्या तारांमुळे वाघीण दगावली; त्या तारा कोणी लावल्या, याचा कसून तपास करावा. चौकशीअंती दोषींवर कडक कारवाई करावी, असे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले. 

वाघाच्या हल्ल्यात व्यक्ती ठार 
कोठारी (जि. चंद्रपूर) : मोहफूल वेचण्यासाठी जंगलात गेलेल्या एका व्यक्तीवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना शनिवारी सकाळी उजेडात आली. नंदू बोबडे (वय 45) असे मृताचे नाव आहे. गोंडपिंपरी तालुक्‍यातील परसोडी येथील नंदू बोबडे हा शुक्रवारी सकाळी मोहफूल वेचण्यासाठी जंगलात गेला होता. मात्र, सायंकाळपर्यंत तो घरी परतला नाही. त्यामुळे घरच्यांनी त्याची शोधाशोध केली. शनिवारी पुन्हा नागरिकांनी शोधमोहीम राबविली. तेव्हा जंगलात त्याचा मृतदेह दिसून आला.

Web Title: Caught in wire snare young tigress dies in Tadoba core